स्वच्छ सुंदर फोंड्याच्या प्रतिक्षेत !

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

फोंड्यातील मार्केट परिसरात अशी स्थिती असते.

पदपथांवर विक्रेत्यांचे अतिक्रमण, रस्त्यांवरील खड्डे कायम, वाहतुकीचा बट्ट्याबोळ

सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी फोंड्यातील नवीन मार्केट संकुलाला भेट दिली होती. त्यावेळी या मार्केट संकुलाचे उर्वरित काम पूर्ण करून लवकरच नियोजनबद्धरीत्या बाजार मांडला जाईल, असे आश्‍वासन देण्यात आले होते. पण आता सहा महिने उलटून गेले तरी अजून कार्यवाही काही दृष्टिपथात येत नाही.

फोंडा : फोंड्यातील पदपथ सध्या विक्रेते आणि दुचाकींनी भरले जात असल्याने पादचाऱ्यांनी चालायचे कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. फोंड्यातील नवीन मार्केटचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत हा प्रश्‍न काही सुटत नाही, त्यामुळे मार्केट संकुलाच्या पूर्णत्वाकडे सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

रस्त्यांचे खोदकाम, रखडत असलेले प्रकल्प यामुळे स्वच्छ सुंदर फोंडा कधी अस्तित्वात येईल, असा सवाल फोंडावासीयांकडून करण्यात येत आहे.

पालिकेकडे असलेल्या निधीचा वापर करण्यासंबंधीची सूचना करण्यात आली असल्याचे ऐकिवात आहे, पण पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल की नाही, याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे.
रस्ते अरुंद त्यात वाढत्या इमारती अशी फोंड्याची स्थिती आहे. फोंड्यातील रस्त्यांचे आणि पदपथांचे योग्य नियोजन करण्याची आवश्‍यकता आहे. त्यादृष्टीने पालिकेने प्रयत्न करावे, अशी मागणी केली जात आहे. फोंडा बसस्थानक ते वरचा बाजारपर्यंत रस्त्याच्या कडेला विक्रेते ठाण मांडून बसलेले असतात. या विक्रेत्यांमुळे पादचाऱ्यांना धड चालायलाही मिळत नाही. त्यातच पदपथावरच दुचाकी आणि चारचाकी वाहने पार्क केली जात असल्याने अडचणीत अधिकच भर पडत आहे.

फोंड्यातील पार्किंगच्या जागा निश्‍चितीसाठी प्रयत्न होण्याची आवश्‍यकता आहे.
फोंड्यातील रस्त्यांची स्थितीही दयनीय आहे. मलनिस्सारण प्रकल्पासाठीचे खोदकाम अजूनही सुरूच आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल, की नाही याबाबतही शंका आहे. त्यामुळे फोंड्यातील रस्ते चकाचक कधी असा सवाल केला जात आहे.

या पदपूलाच्या दुरुस्तीसाठी जलस्त्रोत खात्याकडे नागरिकांची मागणी

बसस्थानकावर सुसूत्रता येण्यासाठी...!
फोंड्यातील जुन्या बसस्थानकावर वाहतुकीत सुसूत्रता येण्यासाठी फोंडा पालिकेने नुकताच ठराव घेतला आहे. फोंड्यातील जुन्या बसस्थानकावर चारचाकी आणि दुचाकी वाहने पार्क केली जात आहे. दिवसभर ही वाहने तेथेच असतात, सकाळी पार्क केलेली वाहने संध्याकाळी काढली जातात, त्यामुळे या जागेचा वापर पार्किंगसाठीच केला आहे काय, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, या ठिकाणी आवश्‍यक झाल्यास पे पार्किंग तसेच इंदिरा मार्केटचे नूतनीकरण असा पालिकेने विचार करून त्यासाठी ठराव घेतल्याने फोंडावासीयांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

फोंडा सुधारणार कधी...!
इतर शहरे सुधारली, पण फोंडा शहर काही सुधारलेले नाही. अजूनही मार्केटचा प्रश्‍न सुटत नाही. रस्त्यावर विक्रेते बेकायदेशीरपणे ठाण मांडून बसतात, लोकांना धड चालता येत नाही. त्यातच रस्ते खड्डेमय, हॉटमिक्‍सिंगचा अजून पत्ता नाही. त्यामुळे आम्ही फोंडावासीयांनी स्वच्छ, सुंदर फोंड्याचा विचार कधी करायचा!
- प्रकाश नाईक (शापूर - फोंडा)

पार्किंगच्या जागा जाहीर करा
फोंडा शहरात सध्या वाढत्या वाहनांमुळे पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. वरचा बाजार भागातील मार्केट संकुलातील वाहन पार्किंगची योजना अजून पूर्णत्वास येत नाही. हे मार्केट संकूल पूर्ण करून निदान या ठिकाणी तरी पार्किंगची व्यवस्था करायला हवी. त्याचबरोबर शहरातील पार्किंगच्या जागा घोषित करून त्यांचे योग्य नियोजन करण्याची आवश्‍यकता आहे.
- धनंजय गावकर (नागझर - कुर्टी)

 

संबंधित बातम्या