कुठ्ठाळीत फायबर बोटींना आग

Dainik Gomantak
सोमवार, 27 एप्रिल 2020

डॉकच्या खुल्या जागेत बोटींचे बांधकाम करण्यात येत होते. अचानक आग लागल्यामुळे बोटींनी पेट घेतला. यात एक बोट पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

कुठ्ठाळी

कुठ्ठाळी-चवथ येथील समीर शिरोडकर यांच्या मालकीच्या डॉकमध्ये बांधकाम करण्यात येत असलेल्या फायबर ग्लास बोटींना आज (रविवारी) संध्याकाळी पाचच्या सुमारास आग लागून कोटी रुपयांचे नुकसान झाले.
याबाबत माहिती अशी की, शिरोडकर यांच्या डॉकच्या खुल्या जागेत बोटींचे बांधकाम करण्यात येत होते. अचानक आग लागल्यामुळे बोटींनी पेट घेतला. यात एक बोट पूर्णपणे जळून खाक झाली आहे. तिला लागूनच असलेल्या दुसऱ्या बोटीनेही पेट घेतल्याने ती अर्ध्याअधिक जळून गेली.
वेर्णा अग्निशामक दलाला माहिती मिळताच दलाचा बंब व जवान घटनास्थळी दाखल झाले. परंतु तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. बंबातील पाणी संपल्याने तो परत भरून येईपर्यंत आग पसरत गेली. तरीही उपस्थित दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा आटोकात प्रयत्न केला.
डॉकचे मालक समीर शिरोडकर यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, याबाबत आपणास काहीच माहीत नाही. बोटींचे बांधकाम करणारा मालक वेगळे आहेत, ते देतील. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या जहाज बांधकाम करणाऱ्या मालकाला विचारले असता, त्यांनी माहिती देण्यास मनस्थिती बरोबर नसल्याचे सांगितल्याने आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.
यावेळी स्थानिक पंच अनिता केंकरे, सरपंच सेनिया परेरा, आमदारांचे स्वीयसचिव क्लीफ वाझ, पंच रेमंड डिसा, पंच यदुसियांना रॉड्रीगीस, पंच ॲन्थनी फर्नांडिस, वेर्णा पोलिस निरीक्षक हरीष मडकईकर व इतर पोलिस उपस्थित होते.

 

संबंधित बातम्या