चित्रपट उद्योगासाठी ‘ईएसजी’ची एक खिडकी सेवा

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

लपुराण चित्रपट निर्माते संजय शेट्ये यांचा अभिनंदनाचा ठराव

मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन : संजय शेट्ये यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर

गोव्यात दरवर्षी सुमारे २०० कोटींची उलाढाल चित्रपटांद्वारे होते. गोव्यात विदेशी तसेच देशी चित्रपटांचे चित्रीकरण होते. मात्र, परवान्यांसाठी त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रत्येक राज्यात चित्रीकरण करणाऱ्यांसाठी सरकारने सुविधा दिल्या आहेत.

 

पणजी : गोव्यात चित्रीकरण केलेल्या संजय शेट्ये निर्मित ‘स्थलपुराण’ या मराठी चित्रपटाची बर्लिन चित्रपट महोत्सवात ‘क्रिस्टल बेअर’ पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल आज विधानसभेत अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात चित्रपट उद्योगासाठी ‘ईएसजी’कडून एक खिडकी सेवा उपलब्ध करण्याचे तसेच ‘पीपीपी’ तत्वावर स्टुडिओसाठी सहकार्य करण्याची सरकारची तयारी असल्याचे आश्‍वासन दिले.

गोमंतकीय चित्रपट निर्माते संजय शेट्ये यांच्या मराठी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवात नामांकन मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव डिचोलीचे आमदार प्रवीण झांट्ये यांनी मांडला होता. गोव्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार आहेत. मात्र, त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नसल्याने ते प्रकाशात येऊ शकलेले नाहीत.त्यामुळे गोव्यातही चित्रीकरण करणाऱ्यांसाठी ‘जीएसटी’मध्ये ५० टक्के सूट दिली जावी. चित्रपट क्षेत्र हे पर्यटनाला प्रोत्साहन देणारे आहे. त्यामुळे सरकारने विदेशी व देशी चित्रपट निर्मात्यांना परवानगीसाठी एक खिडकी सेवा उपलब्ध करावी. तसेच चांगल्या स्टुडिओची गरज असल्याने जागा उपलब्ध करावी, अशी मागणी आमदार झांट्ये यांनी केली.

या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, संजय शेट्ये यांच्या चित्रपटातील ९० टक्के कलाकार गोमंतकीयआहेत. गोवा राज्य लहान असले तरी त्याचा दर्जा या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवून दिला आहे. गोवा मनोरंजन संस्थेमार्फत चित्रपट उद्योगासाठी एक खिडकी सुविधा उपलब्ध केली जाईल.

या अभिनंदन ठरावाच्या चर्चेत सहभागी होताना मंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले, की चित्रपट निर्मात्यांना गोव्यात परवानगीसाठी समस्येला सामोरे जावे लागते. स्थानिक स्वायत्त संस्थांही अडचणी आणतात. त्यामुळे त्यासाठी एक सुटसुटीत प्रक्रिया उपलब्ध करावी. चित्रपटांच्या श्रेणीनुसार त्यांना सुविधा उपलब्ध कराव्यात. या चित्रपटातून गोव्याचे चित्रीकरण होत असल्याने पर्यटनाला चालना मिळेल, असे काब्राल यांनी संजय शेट्ये यांचे अभिनंदनपर ठरावावेळी मत व्यक्त केले.

संजय शेट्ये हे मूळ वास्कोचे असून त्यांची मेहनत व दृढनिश्‍चय यामुळे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले आहे. ते माझे जवळचे मित्र व त्यांनी गोव्याबरोबरच वास्कोचे नावलौकिक केले. त्यांचा मला अभिमान वाटतो. अडचणींवर मात करत त्यांनी हे यशाचे शिखर गाठले आहे, अशी प्रशंसा मंत्री मिलिंद नाईक यांनी केली. गोमंतकीय चांगले कलाकार आहेत हे संजय शेट्ये यांनी आपल्या कोकणी चित्रपटाद्वारे दाखवून दिले आहे. ‘हम किसी से कम नही’ हे त्यांनी बर्लिन चित्रपट महोत्सवासाठी त्यांच्या चित्रपटाची निवड झाल्याने सार्थ ठरवले आहे. त्यांच्या या यशामुळे गोव्यातील उदयोन्मुख कलाकारांनाही प्रेरणा मिळेल व आंतरराष्ट्रीय स्तराचे कलाकार गोव्यात होतील, असे मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले.

बिगर गोमंतकीय कलाकारांना प्रोत्साहन अधिक न देता गोवा सरकारने गोमंतकीयांकडे अधिक लक्ष द्यायला हवे. रोमन लिपीमध्ये तियात्र लिहिले जाते. मी सुद्धा ‘दारून काळीज’, ‘भाट आनी वाट’ व ‘तिकेट’ असे तीन तियात्र रोमन लिपीमध्ये लिहिले आहेत. चौथा तियात्र ‘आमी वैताय, तुमी येयात’ सध्या सुरू आहे. रोमन लिपीच्या चित्रपटांना सरकारने ५० टक्के अनुदान द्यायला हवे, अशी मागणी करून संजय शेट्ये यांच्या यशाबद्दल चर्चिल आलेमाव यांनी त्यांचे अभिनंदन केले.

 

संबंधित बातम्या