आठ कोटींच्‍या विकास कामांची यादी सरकारला सादर : नंदादीप राऊत

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

विरोधी गटातील नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामे अडवून ठेवली होती पण, आपण या भेदभावांना तिलांजली दिली आहे.

मुरगाव: चौदाव्या वित्त आयोगाच्या सहाय्याने मुरगाव पालिकेने आपल्या सर्व २५ प्रभागांत सुमारे ८ कोटी रुपये खर्चाच्‍या विविध विकासकामांना मंजुरी मिळावी यासाठी पालिका संचालनालयाकडे पत्रव्यवहार केला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी दिली.

नगराध्यक्षपदावर आरुढ झाल्यापासून आपण मुरगाव पालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष वेधले आहे. गेल्या सत्तारुढ गटाने अनेक प्रभागात विकासकामे करण्याच्या बाबतीत भेदभाव केला होता.ज्या ज्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागात विकासकामे करण्याची यादी सादर केली आहे त्यांना स्थान देऊन त्यांच्या कामांची यादी पालिका संचालनालयात सादर केली आहे, असे राऊत यांनी सांगितले.

यंदाचे वर्ष पालिका निवडणुकांचे आहे. त्यामुळे प्रत्येक नगरसेवक आपापल्या प्रभागात विकासकामे करण्यासाठी झटत आहेत. त्यांच्या धडपडीला मान देऊन सुमारे आठ कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांना मंजुरी मिळावी यासाठी आपण प्रयत्न सुरू केल्याचे राऊत यांनी सांगितले. मुरगावचे आमदार असलेले नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी ही मंजुरी लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, मुरगाव पालिकेकडे चौदाव्या वित्त आयोगाने दिलेले १५ कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यातील ८ कोटी रुपये विविध विकास कामांवर खर्च केले जातील तर उर्वरित सात कोटी रुपये सडा येथे कचरा प्रकल्प थाटण्यासाठी खर्च करण्यात येतील, असे राऊत यांनी सांगितले. येत्या मार्चपर्यंत चौदाव्या वित्त आयोगाचे पैसे खर्च करावे लागणार, त्यानंतर पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशी लागू होणार असल्याचे राऊत म्हणाले. तथापि, मुरगाव पालिकेने सिग्नेचर प्रकल्प, पालिका इमारत नूतनीकरण, वाहनतळ, मासळी मार्केट अशा प्रकल्पांना चालना देण्याची घोषणा केली होती ती सध्‍या घोषणाच म्हणून कागदावर आहे.याविषयी बोलताना या प्रकल्पांच्या बाबतीत अनेक तांत्रिक बाबी उपस्थित झाल्या आहेत, त्यातून मार्ग निघाल्यावर घोषित केलेले सर्व प्रकल्प मार्गी लागतील, असे राऊत यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या