आगशीतील सुपर मार्केटला आग

Dainik Gomantak
रविवार, 19 एप्रिल 2020

आगशीतील सुपर मार्केटला आग

गोवा वेल्हा,

आगशी मार्केटजवळील ‘शॉप एन सेव्ह’ या सुपर मार्केटला आग लागून संपूर्ण सुपर मार्केट जळून खाक झाले. काल रात्री अंदाजे ११.३० च्या दरम्यान ही आग लागली. मध्यरात्री उशीरापर्यंत अग्निशमन दलाचे जवान येथील आग विझविण्याचे काम करीत होते. यात लाखों रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
टाळेबंदीमुळे आगशी येथील हे सुपर मार्केट बंद होते. रात्री बंद सुपर मार्केटच्या शटरमधून धूर येत असल्याने मार्केटजवळ असलेल्या लोकांच्या मनात घबराहट निर्माण झाली. सुपर मार्केटच्या इमारतीत राहाणाऱ्या लोकांनीही आरडाओरड सुरू केली. सुपर मार्केटला आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक समाज कार्यकर्ते टोनी फर्नांडिस आणि त्यांचे अन्य सहकारी तातडीने मदतीला धावले. प्रथम त्यांनी सुपर मार्केटचे मालक कार्वाल्हो यांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. शटर बंद असल्याने हालचाली करणे कठीण झाले. मात्र, शटर उघडताच प्रथम त्यांनी आग विझवण्याचे काम सुरू केले. जळलेल्या वस्तू बाहेर काढल्या.
दरम्यान, जुने गोवे येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. या दरम्यान आगीने जोरदार पेट घेतला होता. या इमारतीत असलेल्या लोकांना प्रसंगावधान राखून बाहेर काढण्यात आले. तासभर स्थानिक लोकांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तरीही आग आटोक्यात येत नव्हती. त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले अशी माहिती टोनी फर्नांडिस यांनी दिली. आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनीही घटनास्थळी भेट देऊन येथील वस्तुस्थिती जाणून घेतली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेचा पंचनामा झालेला नाही.जुने गोवे येथील अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल होताच त्यांनीही आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीने उग्र स्वरूप धारण केल्याचे पाहून अन्य दुसऱ्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तीन वाहनातील पाणी बंबांच्या मदतीने जवान आग विझविण्याचे काम करीत होते. संपूर्ण सुपर मार्केट पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. लाखो रुपयांच्या वस्तू या आगीत खाक झाल्या. सकाळपर्यंत आग पूर्णतः विझली नव्हती. 

संबंधित बातम्या