मासळी सफाईदार देताहेत एकात्मकतेचा संदेश

Dainik Gomantak
सोमवार, 6 जानेवारी 2020

तेजश्री कुंभार, 

तेजश्री कुंभार, 
पणजी : देशभरात जातीयतेबद्दल आणि एकमेकांच्‍या धर्माबद्दल खुलेपणाने बोलले जात आहे. वयाच्‍या दहाव्‍या वर्षांपासून आमच्‍यातील काहीजण पणजी बाजारपेठेत मासे स्‍वच्‍छ करण्‍याचे काम करीत आहेत. आमच्‍यात हिंदू, मुस्‍लिम आणि ख्रिश्‍‍चन तसेच अन्‍य धर्मियांचाही समावेश आहे. आजवर कधीही आम्‍ही भांडलो नाही किंवा कधीही एकमेकांना जातींवरून टोमणे मारले नाहीत, सलोख्‍याने राहिलो, अशी मते पणजी बाजारपेठेत मासे स्‍वच्‍छ करून जीवन जगणाऱ्या बांधवांनी व्‍यक्‍त केली. जाती केवळ नावाला आहेत, आम्‍हा सर्वांचे रक्‍त लालच असल्‍याचे सांगत कष्‍ट करून कमविणारे हे बांधव विविधतेतून एकतेचा संदेश देत आहेत.

पणजी बाजारपेठेत मासळी स्‍वच्‍छ करून त्‍यांची ग्राहकांच्‍या मागणीनुसार तुकडे केले जाते. या व्‍यवसायात सुमारे २५जण अवलंबून आहेत. मार्टिन फर्नांडिस (विकी) यांच्‍यासह अनसद शेख, अझहर नदाफ, अकबर नदाफ, इस्‍माईल मुल्‍ला, संतोष कारबार, डेव्‍हिड फर्नांडिस, संतोष आमोणकर, लाल नदाफ, रमेश नाईक, हाफिसा बंगाली, परशुराम नाईक, विनोद गायकोट यांच्‍यासह अन्‍य व्‍यक्तींचा समावेश आहे. मडगाव, फोंडा, म्‍हापसा मासळी मार्केटमध्‍ये मासळी साफ करून देणारे मत्‍स्‍यखवय्‍यांना वरदान ठरत आहेत.
मासळी म्‍हटली की ते स्‍वच्‍छ करण्‍याचे मोठे संकट. हिमसट वास येऊ नये म्‍हणून अक्षरश: नाक मुठीत धरून गृहिणी हे काम करतात. फ्‍लॅटमध्‍ये राहणाऱ्यांची तर मोठी कुचंबणा होते. मासे साफ करायचे आणि शिल्लक राहिलेले भाग टाकायचे कुठे, असा प्रश्‍‍न पडतो. मात्र, हे काम मासळी मार्केटमधील काहीजणांकडून स्‍वच्छ करणाऱ्यांकडून मार्गी निघाला आणि खवय्यांना पर्वणी निर्माण झाली. असेच काम पणजीतील मासळी मार्केटमध्‍ये मार्टिन फर्नांडिस यांच्‍याकडून केले जात आहे. 
संतोष कारबार म्‍हणाले, लहानपणीच मी पणजीत शाळा सुरू असताना पोटापाण्‍याला काही कमावता यावे म्‍हणून मासळी साफ करण्‍याचे काम करीत आहे. यावेळीपासून अकबर आणि अझहर माझ्‍यासोबत काम करीत आहेत. आजवर आम्‍ही लहानसहान कारणावरून भांडण होत असली, तरी आम्‍ही एकमेकांना सांभाळून घेण्‍याचे तसेच एकमेकांच्‍या सुख - दु:खात सहभागी होण्‍याचे काम करतो. 
डेव्‍हिड म्‍हणाले, कोणाच्‍याही घरी सण, उत्‍सव किंवा कोणत्‍याही प्रकारचा समारंभ असला की, आम्‍ही एकमेकांना बोलावतो. काही दिवसांपूर्वी येथील मुस्‍लिम बांधव सीएए आणि एनआरसीच्‍याविरोधातील आंदोलनात सहभागी झाले होते. त्‍यांना साथ देण्‍यासाठी त्‍यांच्‍यासोबत आम्‍हीही गेलो होतो. 

मासे साफ केले की साधारणत: आम्‍हाला वीस रुपये मिळतात. ग्राहकांच्‍या मागणीनुसार साफ करून तुकडे करण्‍याचे काम प्रामाणिकपणे केले जाते.  सहकारी मित्राला आर्थिक अडचण भासल्‍यास आम्‍ही सगळे मिळून त्‍याला मदत करतो. खरेतर जातीपाती आणि धर्म या लक्षात ठेवण्‍यासारख्‍या बाबी नसून माणुसकी लक्षात ठेवायला हवी.
-मार्टिंन फर्नांडिस
 

संबंधित बातम्या