दीड वर्षात साकारणार काले रेल्वे उड्डाणपूल :मुख्यमंत्री

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

सांगे व धारबांदोड्यातील चाळीस हजार लोकांना होणार फायदा

देवनामळ येथे रेल्वे उड्डाणपुलाच्या पायाभरणी सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत खासदार विनय तेंडुलकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर, जिल्हा पंचायत सदस्य सुवर्णा तेंडुलकर, सरपंच किशोर देसाई, विलास देसाई, रेल्वे अधिकारी व मान्यवर.

कुडचडे : काले येथील रेल्वे उड्डाणपूल (ओव्हर ब्रिज) व्हावा हे काले वासीयांचे स्वप्न होते. कारण या पुलाअभावी पावसाळ्यात काले गावचे विभाजन होत असे. हे स्वप्न आता अवघ्या दीड वर्षात प्रत्यक्षात साकारणार आहे. एकोणीस मीटर लांबीचा पूल, एकशे चाळीस मीटर जोड रस्ता दोन्ही बाजूने देवनामळ काले भागात जोडण्यात येणार असून, सांगे व धारबांदोडा अशा दोन्ही तालुक्यातील सुमारे चाळीसहजार लोकांना याचा फायदा होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांनी दिली.

रेल्वे विकास निगम ली., आणि सार्वजनिक बांधकाम खाते यांच्या संयुक्त विद्यमाने साडे सहा कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या काले रेल्वे उड्डाणपुलाचा पायाभरणी सोहळ्यात मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर, खासदार फ्रान्सिस सार्दिन, नुवेचे आमदार बाबाशान, जिल्हा पंचायत सदस्य सुवर्णा तेंडुलकर, सरपंच किशोर देसाई, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य विलास देसाई, रेल्वे निगमचे एस. के. झा, शशिभूषण साहू, श्री. वझे, उपसरपंच बाबलो खरात, साकोर्डाचे सरपंच जितेंद्र नाईक, माजी सरपंच काशिनाथ नाईक, संतोष गावकर, सावर्डेचे सुधाकर नाईक, ज्ञानेश्वर नाईक, शिरीष देसाई व कालेवासीय उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, तीन तास उशिरा येऊनसुद्धा कालेवासीय आपल्या भेटीसाठी थांबले याबद्दल त्यांचे आपण आभार मानतो. गेले वर्षभर सरकारने घेतलेले निर्णय लोकांच्या हितासाठी घेतले. आज आर्थिक समस्या असूनही विकास केला जात आहे. पूर्वीच्या काळात आर्थिक समस्या नव्हती, पण कालेवासियांनी मागणी पूर्ण केली नाही. आजच्या लोकप्रतिनिधींना तळमळ आणि कळवळा आहे म्हणूनच हा पूल बांधण्यात येत आहे. केवळ साडेसहा कोटी रुपयांसाठी कालेवासीयांना इतकी वर्षे थांबावे लागले अन् काहीजणांना आपला जीव धोक्यात घालावा लागल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली.

दोन वर्षात अशाप्रकारची समस्या एकाही गावात उरणार नाही याची काळजी घेत शंभर टक्के गोमंतकीयांना वीज, पाणी, सुलभ शौचालय पुरविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मूलभूत विकास कामांबरोबरच माणसांचा विकास करताना शिक्षण, नोकरी, आणि कौशल्य विकास पुरविण्यात येणार आहे. अजून काही महिन्यांत जवळपास दहा हजार नोकरी निर्मिती करण्यासाठी सर्व पाठपुरावा पूर्ण झाला असून, जिल्हा पंचायत निवडणूक आचारसंहिता संपताच नोकऱ्यांसाठी प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.

निवडणुकीत जनतेला दिलेल्या जाहीरनाम्यात कालेचा उड्डाणपूल हा प्रमुख मुद्दा होता. त्याची आता कार्यवाही होत आहे. या कामाबरोबरच कुळे ते कुडचडे आणि चांदर येथील उड्डाणपुलालाही रेल्वे मंडळाने मंजुरी दिली असून, येत्या काही महिन्यात या सर्व कामांना प्रारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री पाऊसकर यांनी देऊन काले उड्डाणपुलाची मागणी पूर्ण केल्याबद्दल रेल्वे मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार विनय तेंडुलकर, खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचे अभिनंदन केले.

गिर्यारोहण प्रकल्पासाठी काले गावात सर्वेक्षण
गिर्यारोहण प्रकल्प साकारण्यासाटी काले गावात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ते शक्य झाल्यास काले गावचा विकास साधणे शक्य होईल. आगामी दोन वर्षात संपूर्ण विकास करण्यासाठी आपला सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

शहर व नगर नियोजन मंडळ बैठक

उड्डाणपुलाचे काम वर्षभरात व्हावे.
राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर म्हणाले, भाजपा कार्याला सुरवात ज्या गावातून केली त्याच गावात आज रेल्वे उड्डाणपुलची पायाभरणी होत असल्याबद्दल आपल्याला आनंद होत आहे. खरे म्हणजे सर्वच आमदारांनी या पुलासाठी प्रयत्न केले. पण, आज हा पूल आजच्या लोकप्रतिनिधींच्या कालावधीत व्हावा, असे कदाचित विधिलिखित असावे. म्हणून या उड्डाणपुलाचे काम वर्षभरात संपविण्यासाठी मुख्यमंत्री सावंत यांनी लक्ष घालावे, अशी मागणीही खासदार तेंडुलकर यांनी केले.

कालेच्या विकासासाठी काम करणार...
सरकार ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सर्वच गोष्टी वेळेवर होईल हे सांगता येत नाही. तरीही उशिरा का होईना कालेवासीयांची मागणी काही महिन्यांत पूर्ण होणार आहे. खासदार निधीतून काले पंचायतीची जी कामे असतील त्या कामाची आपण पूर्तता करणार आहे. यासाठी मतांची अपेक्षा ठेवली जाणार नाही. काले गावचा विकास व्हावा, यासाठी यासाठी आपण काम करणार असल्याची ग्वाही लोकसभा खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी देऊन रेल्वे अधिकाऱ्यांनी कालेतील रेल्वे उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत यांचा पुष्पहार घालून तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सुवर्णा तेंडुलकर यांनीही आपले विचार मांडले. सरपंच किशोर देसाई यांनी स्वागत केले. वसंत सावंत यांनी सूत्रसंचालन केले. बाबलो खरात यांनी आभार मानले.

 

संबंधित बातम्या