पणजी बाजारपेठेत अन्‍न आणि औषध प्रशासन खात्‍याची धाड  

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 1 मार्च 2020

रसायनाद्वारे पिकविली फळे !
अन्न व औषध खात्याचे छापे; मोठ्या प्रमाणावर फळे जप्त

म्‍हापसा बाजारपेठेवर छापा टाकून तेथेही रासायनिक प्रक्रियेचा वापर करून पिकवलेल्‍या फळांचा पर्दाफाश केल्‍यानंतर पणजी बाजारपेठेतही ही कारवाई करण्‍यात आली. लोकांच्‍या पोटात योग्‍य अन्‍न जावे, म्‍हणून आम्‍ही हा खटाटोप करीत असल्‍याची माहिती या छाप्‍याबद्दल मंत्री विश्‍‍वजित राणे यांनी दिली.

पणजी : अन्‍न आणि औैषध प्रशासनाने (एफडीए) शनिवारी पणजी महानगरपालिकेच्‍या मदतीने पणजी बाजारपेठेत झापा टाकून रासायनिक प्रक्रियेच्‍या माध्‍यमातून पिकविण्‍यात आलेली मोठ्या प्रमाणावरील फळे जप्त केली.

यावेळी महापौर उदय मडकईकर आणि एफडीएच्‍या अधिकाऱ्‍यांनी संपूर्ण पणजी बाजारपेठेत प्रत्‍येक दुकानात जाऊन फळांची तपासणी केली आणि ज्‍या फळांच्‍या बाबतीत रासायनिक प्रक्रियेचा अवलंब करण्‍यात आला होता, ती फळे जप्त केली आणि नंतर त्‍यांची विल्‍हेवाट लावण्‍यात आली.

अन्न आणि औषध प्रशासनाच्या या धडक कारवाईचे जनमाणसात स्वागत होत आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळून फळे विकणाऱ्यांचे यामुळे धाबे दणाणले आहेत. अशीच तपासणी अधूनमधून करून ग्राहकांना चांगली फळे मिळतील याची खबरदारी घेण्याची मागणी लोकांमधून केली जात आहे.

‘हॉटेलांचीही तपासणी करणार’
भविष्‍यात राज्‍यातील हॉटेलांचीही अशी तपासणी आणि नंतर कारवाई करण्‍यात येणार आहे. लोकांच्‍या आरोग्‍याशी खेळणाऱ्‍या या लोकांविरोधात आम्‍ही सर्तक आहोत आणि राहणार आहोत. तसेच फळे आणि भाजीपाल्‍याच्‍या बाबतीत केलेल्‍या तपासणीचा तातडीने निकाल हाती यावा म्‍हणून प्रयोगशाळा विकसीत करण्‍याचे कामही सुरू आहे. सुरक्षित अन्‍न खा... या अभियानाला सत्‍यात उतरविण्‍यासाठी आम्‍ही प्रयत्‍नरत आहोत, असे मंत्री विश्‍‍वजित राणे यांनी सांगितले.

 हेही वाचा : म्हादई नदीचे पाणी वळवणारच

अन्न व औषध प्रशासनातर्फे सकाळी सहा वाजल्‍यापासून कारवाईची ही प्रक्रिया सुरू होती. लोकांनी केलेल्‍या तक्रारींमुळे आम्‍ही एकत्रितरित्‍या हे पाऊल उचलले आहे. रासायनिक प्रक्रिया करून फळे विकणाऱ्यांवर आणि प्लास्टिक पिशव्या ठेवणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
- उदय मडकईकर (महापौर)

 

संबंधित बातम्या