‘एफडीए’च्या कारवाईत हवे सातत्य..!

नरेंद्र तारी
मंगळवार, 3 मार्च 2020

राज्यातील बाजारात घातक रसायनयुक्त फळांची तपासणी ‘एफडीए'कडून करण्यात येत आहे. केवळ फळेच नव्हे तर भाजीपाला आणि मासळीही आता स्कॅनरखाली यायला हवी. शेवटी लोक पैसे देऊनच या वस्तू घरी आणतात ना, त्यामुळे लोकांच्या जीविताशी खेळण्याचा हा प्रकार आधी रोखला पाहिजे. दोषींवर कडक कारवाई अपेक्षित असून या कारवाईत सातत्याबरोबरच नवीन यंत्रणेच्या प्रभावी अंमलबजावणीची खरी अपेक्षा आहे. होईल का, ही अपेक्षापूर्ती..!

रासायनिक प्रक्रियेद्वारे फळे पिकवून ती बाजारात ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. केवळ फळेच नाहीत तर रोजच्या आहारातील भाजीपाला आणि मासेही आता काही सुरक्षित राहिलेली नाहीत.

भाजीपाला आणि फळांना रसायनात बुडवल्यानंतर ती लवकर पिकण्याचे आणि जास्त काळ टिकून राहण्याचे तंत्र काही मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या लोकांना अवगत झाले असून माशांशिवाय जगू न शकणाऱ्या गोमंतकीय एका मोठ्या घटकाला आजही मढी ताजीतवानी राहण्यासाठी वापरण्यात येणारे फॉर्मेलीनयुक्त मासे अव्वाच्या सव्वा पैसे देऊन घरी आणावे लागत आहे.

वर्षभरापूर्वी माशांत फॉर्मेलीन असल्याचे सिद्ध झाल्यानंतर आजही मार्केटमधील मासे संशयाच्या स्कॅनरखालीच आहेत. फॉर्मेलीन तपासणीसाठीची अद्ययावत प्रयोगशाळा अजून काही सुरू झालेली नाही. त्यामुळे लोक पैसे मोजून हे विषयुक्त फळे, भाजीपाला आणि मासे घरी आणत आहेत, असे दुर्दैवाने म्हणावे लागते.

म्हापसा तसेच पणजीत अन्न आणि औषध प्रशासनाने ‘एफडीए’ छापे टाकून घातक रसायनयुक्त फळे पकडली आहेत. ‘एफडीए’ने फळांची तपासणी सुरू केली आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. ‘एफडीए’च्या छाप्यात घातक रसायनात बुडवलेली फळे सापडलेली आहेत, त्यामुळे हा व्यवहार काही एक दोन दिवसांचा नाही तर गेला बराच काळ गोमंतकीयांनी अशा घातक फळांचे बिनधास्तपणे सेवन केल्याचे सिद्धही झाले आहे. केळ्यांसह अन्य फळे या घातक रसायनात बुडवून ती लवकर पिकवणे आणि जास्त काळ टिकण्यासाठी वापर केला जातो ही बाब काही लपून राहिलेली नाही.

अधूनमधून हे छापासत्र सुरू होते, पण त्यात सातत्य नसते. प्रत्येक शहर आणि गावातील फळे आणि तत्सम खाद्यपदार्थ तपासून ते खाण्यायोग्य आहे की नाही हे पाहणे आवश्‍यक आहे. पण असा प्रकार होताना दिसत नाही. असो... आता ‘एफडीए’ने ही प्रभावी कारवाई म्हापसा, पणजीत सुरू केल्याने राज्यातील इतर शहरे आणि गावात फळे विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. लोकांच्या खिशातील पैसे घेऊन त्यांना विष पाजून मारणाऱ्या या यमदुतांना आवर घालणे आज महत्त्वाचे ठरले आहे.
पैशांसाठी माणूस आज कुठल्याही थराला जाऊ शकतो. कमी श्रमात जास्त पैसे मिळवण्यासाठी माणसाची धडपड सुरू आहे. पैसा जास्त मिळाला तरी हव्यास वाढत आहे आणि त्यातूनच मग गैरव्यवहाराचा समावेश होत आहे. गोवा हे इतर राज्यांपेक्षा जास्त प्रगत आहे. येथील राहणीमानही उच्च आहे. छानछोकीची बरीच साधने आहेत.

ज्याप्रमाणे गोव्यातील युवक रोजगाराच्या शोधात जास्त पैसे देणाऱ्या आखाती आणि युरोपीय देशात जात आहेत, नेमका तोच प्रकार उत्तर आणि दक्षिण भारतातील लोक रोजगारासाठी गोव्यात येत आहेत. मागच्या काळात तर थिवी येथील रेल्वे स्थानकावर रेल्वेतून उतरणाऱ्या भल्या मोठ्या जमावाबद्दल वर्तमानपत्रे आणि सोशल मीडियावरून प्रसिद्धी मिळाल्यानंतर गोमंतकीयांच्या भुवया उंचावल्या होत्या. आव जाव गोवा तुम्हारा... दुसरे काय!

गोव्याचे क्षेत्रफळ हे इतर राज्यांच्या तुलनेत लहान आहे, त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा ताण या राज्यावर पडण्याचा धोका आहे. एक काळ होता, ज्यावेळेला खाणी आणि इतर तत्सम उद्योग मोठ्या दणक्‍यात चालत होते. त्यामुळे खाण आणि इतर बड्या उद्योगात कामासाठी अशा कामगारांचा मोठ्या प्रमाणात भरणा करण्यात आला. आज परिस्थिती नेमकी उलटी आहे. खाण व्यवसाय बंद पडला आहे, इतर उद्योगांवरही विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे गोव्यात आलो तर खरे, पण रोजगाराचा पत्ता नाही. अशा स्थितीत कमी श्रमात जास्त पैसा कमावण्यासाठी अनैतिक व्यवहारांकडे या परप्रांतीय लोकांचा कल आहे. गोव्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. गोव्यातील विविध गुन्ह्यांत अडकलेल्या लोकांत परप्रांतियांबरोबरच परदेशींचीही संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे.

गोमंतकीयही आज सुशेगाद बनला आहे. आहे ते धंदे भाडेपट्टीवर देऊन पायावर पाय ठेवून बसण्याची गोमंतकीयांची मानसिकता वाढत आहे. त्याबद्दल आणखी काय लिहायचे.
वीस वर्षांपूर्वीचा बाजार आणि आजचा बाजार यात जमीन अस्मानाचा फरक आहे. पूर्वी फळे पिकवली जायची, पण ती रासायनिक प्रक्रिया करून नव्हे तर गावठी पद्धतीने घरच्या घरी ही फळे पिकवली जायची. त्यात कोणत्याच प्रकारची हानी नसायची. पण आता बदलत्या तंत्रयुगात नवनवीन युक्‍त्या आणि क्लुप्त्या शोधून काढल्या जात आहेत. घातक रासायनिक प्रक्रियेतील अन्नपदार्थ खाऊन उद्या माणूस मेला तरी चालेल, पण आज जो काही व्यवहार होईल, त्यातून पैसा मिळाला म्हणजे बस्स, ही घाणेरडी वृत्ती बळावली आहे.

त्यामुळेच बाजारातील केवळ फळेच नव्हे तर भाजीपाला आणि मासळीसह अन्य खाद्यपदार्थ तपासणीसाठी प्रभावी यंत्रणा राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. केवळ पैसा कमावण्यासाठी लोकांच्या गळ्याखाली फळे, भाजीपाला आणि मासळीच्या रुपातील हे विष उतरवू पाहणाऱ्या यमदुतांवर आधी कडक कारवाई व्हायला हवी. कर्करोगासारख्या घातक रोगासह इतर जीवघेण्या रोगांचा फैलाव होत आहे, त्यामुळेच तर अशी प्रभावी कारवाई होणे ही काळाची गरज आहे.
एफडीए खात्याचे मंत्री विश्‍वजित राणे यांनी या पार्श्‍वभूमीवर दोषींची गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. रासायनिक प्रक्रियेतील घातक वस्तू बाजारात आणणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेशही मंत्र्यांनी दिले आहे, त्यामुळे त्यांचे अभिनंदन करायला हवे.

पण या कारवाईत सातत्य असायला हवे. राज्याच्या वेशीवरच अशाप्रकारची प्रभावी तपासणी यंत्रणा असायला हवी. वेशीवरून निसटली तर बाजारात तपासणी व्हायला हवी. पण लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या घातक तंत्राचा बिमोड व्हायलाच हवा. दुर्दैवाने राज्याच्या वेशीवर कार्यरत आपली वाहतूक, पोलिस आणि तत्सम सुरक्षा यंत्रणा कोणत्याप्रकारे काम करते हे कालचे शेंबडे पोरही सांगू शकते, त्यामुळे वेशीवरील तपासणीबद्दल जास्त काय लिहिणे. निदान जनतेच्या खाण्यापिण्याच्याबाबतीत तरी सरकारी प्रामाणिकपणा अपेक्षित आहे.

नवीन सरकारला आता वर्ष पूर्ण होणार आहे. या वर्षभराचा आढावा घेताना सरकारने काय केले आणि काय नाही, त्याचा लेखाजोखा सरकारनेच मांडायला हवा. मुळात लोकांच्या जीविताशी बिनधास्त खेळून पैसा कमावणाऱ्यांच्या मुसक्‍या प्रशासनाने आवळल्या तरी बस्स आहे. दिवसभर राबराबून घामाकष्टाच्या पैशातून आपल्या कुटुंबासाठी विषजन्य फळे, भाजीपाला आणि मासळी घेऊन घरी यायचे, म्हटल्यावर आणखी काय सांगायचे..! हे विष पाजून उद्याची पिढीच आपण खुडू पाहत आहोत, असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. म्हणूनच तर सरकारी यंत्रणेकडून घातक रसायनयुक्त फळे, भाजीपाला आणि मासळीची प्रामाणिक तपासणीची सर्वसामान्यांची मागणी रास्त आहे. ‘एफडीए'मंत्री विश्‍वजित राणे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहेच. मात्र या कारवाईत सातत्य ठेवून अत्याधुनिक यंत्रणेचा वापर अशा घातक फळे, भाजीपाला, मासळी आणि तत्सम वस्तूंच्या तपासणीसाठी व्हावा, एवढीच लोकांची माफक अपेक्षा.

 

संबंधित बातम्या