किनाऱ्यावरील भटक्या कुत्र्यांनाही अन्न

Dainik Gomantak
बुधवार, 22 एप्रिल 2020

जीवरक्षकांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी या भटक्या कुत्र्यांसाठी अन्नदान करणे सुरु केले आहे.

पणजी

सध्या कोविड १९ टाळेबंदीच्या काळात पर्यटकांविना समुद्र किनारे सुनेसुने आहेत. त्यामुळे पर्यटकांनी फेकलेल्या अन्नांवर जगणाऱ्या भटक्या कुत्र्यांना सध्या अन्न मिळेनासे झाले आहे. त्यांची काळजी करत समुद्र किनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांना अन्न देण्याचा प्रयत्न दृष्टी मरीनच्या जीवरक्षकांनी सुरु केला आहे.
सध्या क्वचितप्रसंगी विदेशी पर्यटक समुद्रात उतरण्याचा प्रयत्न करतात, त्याना रोखण्यासाठी दृष्टी मरीनचे जीवरक्षक सध्या तैनात आहेत. एरव्ही पर्यटकांनी मागे सोडलेले अन्न खात अनेक कुत्री जगत होती. सध्या त्यांना खायला काही मिळत नसल्याने ती अन्नाच्या शोधात किनाऱ्यावर भटकत असतात. त्यांना जगवण्यासाठी जीवरक्षकांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी या भटक्या कुत्र्यांसाठी अन्नदान करणे सुरु केले आहे.
किनाऱ्यावर अनेक पक्षी आहेत, काही भटकी गुरेही आहेत. त्यांचे सध्या अन्न पाण्यावाचून हाल होऊ लागले आहेत. शॅकमधून उरलेले अन्न फेकले जात असे. अशा फेकलेल्या अन्नावरच या पशू पक्षांची गुजराण होत असे. टाळेबंदीमुळे शॅक बंद पडले आणि या सगळ्यांना अन्नासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. त्यांचे हाल न बघवून जीवरक्षकांनी त्यांना पिण्यासाठी पाणी आणि खाण्यासाठी अन्न उपलब्ध करणे सुरु केले आहे. ज्या ज्या किनाऱ्यांवर जीवरक्षक तैनात आहेत तेथील परिसरातील अशा मुक्या जनावरांची काळजी ते घेऊ लागले आहेत.
जनावरांना पाणी पिण्यासाठी एक मोठे भांडे ठेवण्यात आले असून त्यातील पाणी संपल्यावर ते परत भरले जाते. सगळे पशू पक्षी त्या भांड्यातील पाणी पितात. गेले आठवडाभर दृष्टी मरीन कंपनीने अन्न पुरवण्यासाठी मदत करणे सुरु केल्याने जीवरक्षकांनी आता हे नित्याचे काम सुरु केले आहे. बागा ते सिकेरी दरम्यानच दोनशे भटकी कुत्री आहेत. त्यांना आता अन्न मिळू लागल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
कोहिबा नावाचा हॉटेलाच्या स्वयंपाकघरात या जनावरांसाठी अन्न शिजवले जाते. ३० किलो अन्न व तीस लीटर पाणी किनाऱ्यांवर दररोज उपलब्ध केले जाते, अशी माहिती कंपनीचे कार्यकारी संचालक रवी जयशंकर यांनी दिली. त्यांनी सांगितले, जुनेगोवे येथील वारसा स्थळाच्या आसपासही भटके कुत्रे आहेत. त्यांनाही मानवतेच्या दृष्टीकोनातून अन्न पुरवण्यात येत आहे.

संबंधित बातम्या