फुटबॉल प्रशिक्षक मिकी बनला ड्रमर!

dainik gomantak
शनिवार, 2 मे 2020

गोवा फुटबॉल असोसिएशनच्या स्पर्धा २० मार्चपासून स्थगित आहेत. यात प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेचाही समावेश आहे. सध्यातरी राज्यातील फुटबॉल पूर्ववत कधी होईल याचा नेम नाही.

पणजी,

 कोरोना विषाणू महामारीमुळे क्रीडा जगत ठप्प आहे, त्यात खेळाडू, प्रशिक्षक आणि अन्य संबंधितांचा स्वतःला व्यस्त राखण्याचा प्रयत्न आहे. वास्को स्पोर्टस क्लबचे प्रशिक्षक मिकी फर्नांडिस यांनी लॉकडाऊन कालावधीत ड्रमर बनण्याची हौस भागवून घेतली.

गोवा फुटबॉल असोसिएशनच्या स्पर्धा २० मार्चपासून स्थगित आहेत. यात प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेचाही समावेश आहे. सध्यातरी राज्यातील फुटबॉल पूर्ववत कधी होईल याचा नेम नाही. फुटबॉल नाही, निदान ड्रमवर हातसफाई करावी या विचाराने मिकी यांनी वाद्यवादनाचा ठेका धरला. याविषयी त्यांनी सांगितले, की ``मला ड्रम वाजविणे आवडते. बालपणीचा हा माझा छंद आहे.``

स्थानिक लीग स्पर्धेबाबत अनिश्चितता असली, तर मिकी यांनी घरी स्वतःला व्यस्त राखले आहे. घरीच शारीरिक कसरती, व्यायाम याबरोबर मानसिक स्वास्थासाठी संगीत ऐकणे आदींमुळे मिकी यांचा दिवस कंटाळवाणा ठरत नाही. व्यायाम करण्यासाठी जिममध्येच जायला हवं असं नाही, तुम्ही घरीही करू शकता, हा त्यांचा संदेश आहे. कोविड-१९ कालावधीत त्यांनी शाकाहारावर जास्त भर दिला, मांसाहाराकडे दुर्लक्ष केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते मित्रांच्या संपर्कात राहिले, तसेच मनोरंजकात्मक माध्यमाद्वारे दिनक्रम व्यतित केला.

मिकी यांच्या मार्गदर्शनाखालील वास्को क्लब यंदाच्या प्रो-लीग स्पर्धेत पदावनती टाळण्यासाठी संघर्षरत आहे. १२ संघांच्या स्पर्धेत संघाचे २० सामन्यांतून २२ गुण असून दोन सामने बाकी आहेत. काही मोसमापूर्वी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पेन्ह-द-फ्रान्स क्लबने प्रो-लीग स्पर्धेसाठी पात्रता मिळविली होती, पण आर्थिक कारणास्तव नंतर माघार घेतली होती.

 

फुटबॉल मैदानावरील अनुभवी...

३७ वर्षीय मिकी हे सेझा अकादमीचे माजी प्रशिक्षणार्थी आहेत. खेळाडू या नात्याने मोहन बागान, एअर इंडिया, चर्चिल ब्रदर्स, स्पोर्टिंग क्लब द गोवा, धेंपो स्पोर्टस क्लब या संघांकडून खेळले आहेत. निवृत्तीनंतर मिकी यांनी प्रशिक्षणात स्वारस्य दाखविले, या वर्षी त्यांनी प्रशिक्षणातील एएफसी बी-लायसन्स मिळविले. २००५ मध्ये संतोष करंडक जिंकलेल्या गोव्याच्या संघाचे ते सदस्य होते, आय-लीग विजेत्या धेंपो स्पोर्टस क्लबचेही त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. मिकी २०१७ साली वास्को क्लबमध्ये खेळाडू-प्रशिक्षक या नात्याने रुजू झाले. त्यापूर्वीच्या मोसमात प्रथम विभागीय संघ पेन्ह-द-फ्रान्स स्पोर्टस क्लबतर्फे त्यांनी प्रशिक्षक ही ओळख तयार केली होती.

संबंधित बातम्या