वास्कोत मोफत धान्य वाटपाची योजना

dainik Gomantak
रविवार, 3 मे 2020

मंदिरातील पुजारी, फुल विक्रेते, मोटारसायकल पायलट, बसचालक, वाहक, रिक्षाचालक, वेस्टर्न इंडिया शिपयार्डचे बेरोजगार कामगार या मुरगावमधील सुमारे ३०० लोकांना मोफत जीवनावश्‍यक वस्तू देण्यास आज गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष तथा मुरगावचे नेते संकल्प आमोणकर यांनी आपल्या बायणा येथील कार्यालयातून प्रारंभ केला. सुमारे तीन महिने ३०० नागरिकांना मोफत जीवनावश्‍यक वस्तू देण्यात येणार आहेत.

मुरगाव

मंदिरातील पुजारी, फुल विक्रेते, मोटारसायकल पायलट, बसचालक, वाहक, रिक्षाचालक, वेस्टर्न इंडिया शिपयार्डचे बेरोजगार कामगार या मुरगावमधील सुमारे ३०० लोकांना मोफत जीवनावश्‍यक वस्तू देण्यास आज गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष तथा मुरगावचे नेते संकल्प आमोणकर यांनी आपल्या बायणा येथील कार्यालयातून प्रारंभ केला. सुमारे तीन महिने ३०० नागरिकांना मोफत जीवनावश्‍यक वस्तू देण्यात येणार आहेत.
‘कोविड-१९’ मुळे केंद्र सरकारने टाळेबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे सर्वचजण संकटात सापडले असून कमकुवत घटकांची स्थिती दयनीय झाली आहे. दैनंदिन कमाईवर आपल्या कुटुंबाची गुजराण करणारे लोक बरेच त्रासात पडले आहेत. त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी श्री. आमोणकर यांनी स्वखर्चाने मे ते जुलै महिन्यापर्यंत तीन महिने मोफत रेशन त्यांना देण्याची घोषणा केली. मंदिरातील पुजारी, फुल विक्रेते, मोटारसायकल पायलट, रिक्षाचालक, बसचालक, वाहक आणि वेस्टर्न इंडिया शिपयार्डच्या बेरोजगार कामगारांसाठी श्री. आमोणकर यांनी ही योजना आखली आहे. मुरगाव मतदारसंघातील या घटकांसाठी ही योजना असून या योजनेचा लाभ सुमारे ३०० जणांना मिळणार आहे.
बारा किलो तांदूळ, पाच किलो आटा, दोन किलो साखर, दोन किलो तुरडाळ, दोन लिटर खाद्य तेल, मसाला, मीठ अशा वस्तू श्री. आमोणकर यांच्यामार्फत वरील घटकांना पुढील तीन महिने देण्यात येणार आहेत.
वास्तविक ही योजना सरकारने किंवा त्या त्या आमदार-मंत्र्यांनी वरील घटकांसाठी राबविणे आवश्यक होते. कोविड-१९ साठी सरकारच्या तिजोरीत देणगीतून करोडो रुपये जमा झाले आहेत. त्या आणि केंद्राकडून मिळालेल्या आर्थिक सहाय्यातून कमकुवत घटकांना मोफत रेशन सरकारने पुरवायला हवे होते, पण वरील घटकांचा कोणीच विचार केला नाही, असे श्री. आमोणकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सरकारने जसे बांधकाम मजुरांना आर्थिक सहाय्य केले तशीच योजना वरील घटकांसाठी राबविणे आवश्यक आहे. जेणे करून कष्टाळू जीवन जगणाऱ्यांना आधार मिळेल, असे ते म्हणाले.
टाळेबंदीमुळे अनेक घटकांच्या कमाईवर विपरीत परिणाम झाला आहे. मंदिरे बंद असल्याने पुजाऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. फुल विक्रेत्यांचाही व्यवसाय बंद आहे. प्रवासी बसेस बंद असल्याने चालक आणि वाहक यांची स्थिती बिकट झाली आहे. ऑटो रिक्षा, मोटारसायकल पायलट बेरोजगार झाले आहेत. या सर्वांसमोर जीवन कसे चालवावे हा यक्ष प्रश्न उभा आहे. त्यांना माणुसकीच्या दृष्टीने मदत करण्याच्या इराद्याने आपण पुढाकार घेऊन तीन महिन्यांसाठी मोफत रेशन देण्याचे ठरविले आहे, असे श्री. आमोणकर यांनी याप्रसंगी पत्रकारांकडे बोलताना सांगितले.
याप्रसंगी नगरसेविका भावना भोसले, श्रद्धा आमोणकर, नगरसेवक नीलेश नावेलकर, मुरगाव गटाध्यक्ष महेश नाईक, शंकर पोळजी, सचिन भगत, सेबी फर्नांडिस, अब्दुल रशीद, समीर खान व इतर उपस्थित होते.

विविध संघटनांकडून श्री. आमोणकर यांचे आभार
श्री. आमोणकर यांनी गरीब आणि कमकुवत घटकांचा विचार करून तीन महिने मोफत रेशन देण्याची घोषणा केल्याबद्दल मुरगाव मोटारसायकल पायलट संघटनेचे अध्यक्ष बाबू आसोलकर, लोकमान्य ऑॅटो रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष जयंत मोर्जे, सतीश नाईक, बसचालक प्रेमानंद बांदेकर, कृष्णा मेस्ता, पुजारी सुहास लिमये, वेस्टर्न इंडिया शिपयार्डचे विष्णू नाईक यांनी श्री‌ .आमोणकर यांचे आभार मानले.

संबंधित बातम्या