चवदार, उत्कृष्ट फळांचा म्हापसा येथे बाजार

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

म्हापसा मार्केटमध्ये चांगल्या फळांची विक्री

म्हापशातील मार्केट सबयार्डमध्ये उपलब्ध असलेली फळे.

ग्राहक चळवळीत सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे, की सध्या मार्केटिंगचा जमाना आला आहे. मालाला चकाकी मिळावी म्हणून काही वेळा रंगरंगोटी केलेली फळेही विकली जातात.

म्हापसा : आजकाल आपल्या आयुष्याला एक प्रकारची गती आलेली आहे. गतिमान जीवन जगताना कित्येक बाबतींत काळजी घेतली जात नाही. फळे खरेदी करताना योग्य ती काळजी घेऊन खरेदी करणे आवश्‍यक ठरते. या पार्श्‍वभूमीवर म्हापसा मार्केट सबयार्डमध्ये चांगल्या प्रतीच्या फळांची विक्री केली जातेय, असे आढळून आले आहे.

मुद्दामहून इंजेक्‍शनद्वारे कलिंगड फळे वगैरेत लाल रंग आणला जातो. कुठे सफरचंदे कृत्रिमरित्‍या पिकवली जातात. इंजेक्‍ट केलेल्या जागेवर नंतर छोटासा स्टीकरही लावला जातो. रंगतदार पाण्यात बुडवून फळांवर चकाकी आणली जाते. वेळेअगोदर ती पिकवली जातात.

कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे, की हे सगळे जरी खरे असले तरी त्याचे प्रमाण फार कमी असते. आपण जी फळांची खरेदी करतो तो विक्रेता आपल्या नेहमीच्या परिचयातला निवडावा. एका जागी दुकान असलेले फळविक्रेते पाहून खरेदी करावी. कुठेही रस्त्याच्या कडेला वगैरे उभे राहून एकच एक वस्‍तू विकणाऱ्या अपरिचित व्यक्‍तीकडून सहसा खरेदी करू नये. अगदी जाता जाता मिळतात म्हणून फुटपाथवर उभे राहून विकणाऱ्याकडून खरेदी करणे टाळावे.

ओळखीचा फळविक्रेता सर्वसाधारणपणे आपल्याला रोजचे गिऱ्हाईक म्हणून चांगली निवडलेली फळे देत असतो. थोड्याफार प्रमाणात लुबाडणूक करणारे असतातच. ते सगळीचकडे सापडतात. फळे विकणारा कोण आहे, हे त्याच्या पेहरावावरून वगैरे ओळखायला शिकले पाहिजे. त्यांना ओळखणे सहज शक्‍य असते.

स्वस्त मिळते म्हणून खरेदी करू नये. खाण्यास अयोग्य वस्तूंचा आपल्या प्रकृतीवर परिणाम होत असतो. कुठे माल खपला नसल्याने टाकून दिला जातो. त्यातली थोडीफार चांगली तेवढी निवडून विकण्याचे कुकर्म गरजवंत आणि पोट खपाटीला गेलेले करू शकतात. तसेच पैशाला चटावलेलेसुद्धा अशा प्रकारचे धाडस करीत असतात. लवकरात लवकर श्रीमंत होण्याची स्वप्ने बघणारे काही व्यापारी रासायनिक द्रव्ये वगैरे वापरून फळे पिकवत असतात. अशा महाभागांना पकडणे हे आरोग्य विभागाचे, अन्न आणि औषधे प्रशासनाचे काम असते. परंतु, ते काम शासकीय अधिकारी प्रामाणिकपणे करीत नाहीत.

फॉर्मेलिन वापरून माशांच्या बाबतीत केली जाणारी लबाडी अलीकडेच जगजाहीर झाली होती. काही मासेविक्रेत्या हातचलाखीद्वारे पसरून ठेवलेला माशांचा अर्धा वाटा टोपलीत टाकण्यात वाकबगार असतात. यासाठी आपणच जागरूक राहिले पाहिजे. एकदा फसवले गेल्यावर पुन्हा त्या विक्रेत्याकडे जाऊ नये. फसवणूक करून पैसे कमावणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे हे नक्की. फळफळावळ, भाज्या, मासे यांच्या विक्रीबाबत थोड्याफार प्रमाणात हे दिसून येते.

आपले सहकारी तसेच मित्र निवडताना जशी आपण सावधगिरी बाळगतो तशीच सावधगिरी वस्तू खरेदी करताना बाळगावी. फसवणाऱ्यांना टाळून इतरत्र खरेदी करावी. थोडे पैसे जास्त मोजावे लागले तरी चालेल; पण, चांगली खरेदी करता आली पाहिजे. तसेच फळांचा मार्केट सबयार्डमध्ये घाऊक व्यापार चालतो तिथे जरा चालत जाऊन गर्दीतून जाऊन खरेदी केली तर फळेही चांगली मिळतात आणि थोडी स्वस्तही असतात. विक्रेते तिकडूनच खरेदी करून बाजारात येऊन रस्ता अडवून बसतात व स्वत:चे कमिशन लावून धंदा करतात.

दुकानदारांचे म्हणणे आहे, की यार्डमधील दुकानांतूनही फळफळावळीची, भाज्यांची खरेदी केलेली चांगलीच असते. तिथे मोजून-मापून, तोलून केळी, सफरचंद इत्यादींची खरेदी केली जाऊ शकते. हल्ली सोशल मीडियावरून बऱ्याच गोष्टी लगेच व्हायरल होतात. म्हणून सगळेच काही किडलेले आहे असे होत नाही. चांगुलपणाही या जगात बराच शिल्लक आहे.

 

 

कलात्मक कृषी वस्तूंचे प्रदर्शन

संबंधित बातम्या