वेंडल रॉड्रिग्ज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

वेंडल रॉड्रिग्ज यांचा पार्थिव देह कोलवाळ येथील दफनभूमीवर नेला जात असताना.

वेंडल रॉड्रिग्ज यांच्या वैवाहिक जीवनातील जोडीदार जेरोम यांचे सांत्वन करताना नातेवाईक व मित्रमंडळी.

कोलवाळमध्ये दफनविधी, मंत्री-आमदारांसह मित्रमंडळींकडून कुटुंबाचे सांत्वन

म्हापसा : प्रसिद्ध फॅशन डिझाईनर म्हणून जगभरात व सिने जगतात सुमारे दोन दशके आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवलेले कोलवाळचे सुपुत्र वेंडल रॉड्रिग्ज यांचे निधन झाल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता कोलवाळ येथील सेंट फ्रान्सिस ऑफ आसिसी चर्चच्या दफनभूमीवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वेंडल यांच्या आत्म्याला शांती प्राप्त व्हावी यासाठी चर्चमध्ये कोलवाळचे सुपुत्र फादर फ्रेडी लोबो यांनी त्यांच्यासाठी शेवटची प्रार्थना केली. फादर जानवायर दा कॉस्ता यांनी दफनभूमीत अंतिम विधी करून प्रार्थना केली. हे विधी केले जात असताना वेंडल यांच्या आयुष्यातील जोडीदार जेरोम यांचे वेंडल यांचे नातेवाईक व मित्रमंडळीने सांत्वन केले.

या वेळी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माजी पर्यटनमंत्री तथा स्थानिक विद्यमान आमदार नीळकंठ हळर्णकर, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे तसेच समाजातील विविध थरांतील लोक उपस्थित होते.
वेंडल यांनी नाताळाच्या सणावेळी स्वत:च्या मित्रपरिवाराला व नातेवाइकांना शुभेच्छा दिल्या होत्या व त्यांनी आनंदाने नाताळ सण साजरा केला होता. उपलब्ध माहितीनुसार, गेल्या महिन्यात मधुमेहाच्या विकाराने त्यांना अधिक त्रस्त केले होते. मधुमेह आटोक्‍यात आणण्यासाठी दररोज वैद्यकीय तपासणी करून डॉक्‍टर औषधोपचार करीत असत; पण, १२ रोजी दुपारी ते जेवण घेऊन वामकुक्षी घेतली असतात मधुमेह विकार वाढल्याने त्यातच त्याचे निधन झाले, असेही त्यांची काळजी घेण्यासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी स्थानिकांना सांगितले.

वेंडल यांनी स्वत:च्या फॅशनच्या दुनियेत अनेक नामवंत कलाकारांसाठी फॅशन डिझाइनिंगचे काम केले होते. ऑस्ट्रलिया, इंग्लंड, दुबई, कुवेत यांसारख्या अनेक देशांत फॅशन डिझाइनविषयक अनेक कार्यक्रम करून त्यांनी लोकप्रियता प्राप्त केली होती. कोलवाळ गावातील कित्येक सांस्कृतिक कार्यक्रमांत तथा सामाजिक उपक्रमांत भाग घेऊन अनेक लोकांना त्यांनी मदत केली होती. कोलवाळ गावातील विविध सामाजिक चळवळींत सक्रियरीत्या भाग घेतला होता. त्यातील जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पेलून लोकांचे प्रश्‍न सोडवण्यात योगदान दिले होते. कोलवाळ फट्टीर येथे कचरा टाकण्यासाठी आलेल्या ट्रकांना विरोध करण्यात वेंडल यांनी ग्रामस्थांबरोबर पुढाकार घेतला होता.

त्यामुळे तो कचरा तिथे टाकण्यापासून त्यांनी संबंधितांना कायमचे परावृत्त केले होते.
राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरी रुंदीकरणाच्या वेळी स्वत:च्या कोलवाळ येथील घराजवळ असलेले कपेल मोडण्यास त्यांनी विरोध दर्शवला होता व त्यात त्यांना यश आले होते. अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचे घनिष्ट संबंध होते. कित्येक संस्थांना त्यांनी अर्थसाहाय्यही केले होते.

 

संबंधित बातम्या