फुर्तादो-मडकईकर यांच्यात खडाजंगी!

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 10 मार्च 2020

पणजीः पणजी महापालिकेचे २०२०-२१ चे अंदाजपत्रक सादर करण्यासाठी आज बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेत महापौर उदय मडकईकर आणि माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. नगरसेवकांनी अंदाजपत्रक स्थायी समितीत मंजूर न झाल्याने त्यावर घेतलेल्या आक्षेपामुळे महापौर उदय मडकईकर यांनी ही सभा तहकूब करीत असल्याचे जाहीर केले.

पणजीः पणजी महापालिकेचे २०२०-२१ चे अंदाजपत्रक सादर करण्यासाठी आज बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेत महापौर उदय मडकईकर आणि माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. नगरसेवकांनी अंदाजपत्रक स्थायी समितीत मंजूर न झाल्याने त्यावर घेतलेल्या आक्षेपामुळे महापौर उदय मडकईकर यांनी ही सभा तहकूब करीत असल्याचे जाहीर केले.

महापालिकेच्या सभागृहात आज सायंकाळी २०२०-२१ च्या वर्षासाठीचे अंदाजपत्रक मांडण्यात येणार होते. परंतु अंदाजपत्रकाला स्थायी समितीने मंजुरी दिली नसताना अंदाजपत्रक कसे सादर करू शकता, असा सवाल सुरवातीलाच नगरसेवक रूपेश हळर्णकर यांनी उपस्थित केला. हा सवाल उपस्थित होताच महापौर मडकईकर यांच्यावर सुरेंद्र फुर्तादो, पुंडलिक राऊत देसाई व हळर्णकर यांनी प्रश्‍नांची सरबत्ती केली, पण आपल्यापरिने मडकईकर यांनी तिघांचा वार पलटवून लावण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर स्थायी समितीच्या कोणत्या सदस्याने आपणास अंदाजपत्रक मंजूर झाले नाही, ते सांगितले त्याचे नाव सांगावे, असे महापौर म्हणाले. त्यावर फुर्तादो आणि हळर्णकर यांनी स्थायी समितीने दिलेली लेखी संमतीचे पत्र दाखवावे, असा उलट प्रश्‍न महापौरांना केला. फुर्तादो यांनी अंदाजपत्रकात कर्मचाऱ्यांनी मारावयाच्या शेरा असलेल्या कॉपी कशा आल्या, याविषयी प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर त्या चूकून आल्या असतील, असे महापौरांनी सांगितले.

महापालिकेला कोणाच्या काळात किती फायदा झाला, या मुद्यावरून पुन्हा एकदा फुर्तादो आणि मडकईकर यांच्यात जुंपली. शाब्दिक वाद एवढा उफाळून आला की दोघांचेही चेहरे लालबूंद झाले होते. दोघांच्या मध्यभागी बसलेले आयुक्त संजित रॉड्रिग्ज हे दोघांचा आवेश पाहात होते. हळर्णकर यांनी मध्येच पुंडलिक राऊत देसाई यांनी महापौरांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करीत राऊत देसाईंच्या आक्षेपाला फुंकर घातली. राऊत देसाई यांनी आपण सकाळी पत्र दिले होते, त्या पत्राचे उत्तर तुम्ही देऊ शकत नाही असे सांगितले. त्यावर महापौर मडकईकर यांनी सकाळी लिहिलेल्या पत्राला संध्याकाळी स्पष्टीकरण कसे देता येईल, असे सांगताच मागील पत्राचाही त्यांनी सभागृहाला कल्पना दिली. अखेर महापौरांनी अंदाजपत्रक सादर करण्याची बैठक तहकूब केली असून ती पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले.

भय, भीती आणि डर..!

स्थायी समिती ही महापालिकेतील महत्त्वाची समिती. सर्वसाधारण सभेत येणारे मुद्दे हे स्थायी समितीमध्ये मंजूर होतात आणि मग ते सभागृहात मांडले जातात. अंदाजपत्रकाला जर स्थायी समितीमध्ये मंजुरी मिळाली नव्हती, तर समितीने आजच्या सभेला सकाळीच विरोध करून सभा पुढे ढकलण्याची विनंती करायला हवी होती. समितीतील उपस्थित सदस्यांनी आजच्या या सभेत मांडल्या जाणाऱ्या अंदाजपत्रकाला विरोध दर्शविला नाही, हे विशेष. कारण महापौर निवड जवळ आल्याने कोणाला महापौरपदाचे, तर कोणाला उपमहापौरपदाचे स्वप्न पडू लागले आहे. जर सभेत काही बोललो तर उगाच आमदारांच्या मर्जीतून उतरण्याची भीती त्यांना वाटत असावी. त्यामुळे ‘अळीमिळी गुपचिळी’ असा काहीसा प्रकार सभेत दिसून आला.

 

संबंधित बातम्या