पैंगीणची गड्यांची जत्रा स्थगित

Dainik Gomantak
शनिवार, 2 मे 2020

३ मे रोजी कोंडा फोडून या जत्रोत्सवाच्या विधीना सुरूवात होते. १६ मे रोजी जत्रोत्सवाचा प्रमूख दिवस ठरवण्यात आला होता.

काणकोण

पैंगीण पंचायत क्षेत्रातील महालवाडा- पैगीण येथील श्री बेताळ देवाची प्रसिद्ध  गड्याची जत्रा यंदा कोविड-१९ मुळे स्थगित करण्यात आली आहे.या संदर्भातील निर्णय श्री परशुराम पंचैग्राम देवालय समितीने घेतला असल्याचे समितीचे अध्यक्ष दामोदर फळगावकर व व्यवस्थापक उदय प्रभूगावकर यानी सांगितले.३ मे रोजी कोंडा फोडून या जत्रोत्सवाच्या विधीना सुरूवात होते. १६ मे रोजी जत्रोत्सवाचा प्रमूख दिवस ठरवण्यात आला होता.या काळात पैगीण, लोलये व खरेगाळ या त्रिग्रामात लग्न,मुंजी, घरप्रवेश अशी शुभ कार्ये न करण्याची प्रथा आहे.  दर तीन वर्षानी हा जत्रोत्सव होतो.एका वर्षी जेवणी,दुसऱ्या वर्षी टका व तिसऱ्या वर्षी गड्याची जत्रा असते. या जत्रेत सुमारे पंचेचाळीस फूट उंचावर लाकडी खांबावर लाकडी रहाट बसवला जातो.या रहाटाला अवसर आलेल्या गड्याना बांधून रहाट गरगरा फिरवला जातो.हा चित्तथरारक प्रसंग पाहण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या भागातील भाविक मोठ्या संख्येने या जत्रोत्सवाला उपस्थिती लावतात. दोन लाकडी खांबापैकी एक खांब जीर्ण झाला आहे त्याच्या जागी दुसरा खांब बसवणे गरजेचे आहे.या खांबसाठी खोला येथे वक्ष शोधण्यात आला.यापूर्वीही खोला येथून खांब आणला होता. तो कापणे व त्याची वाहतूक देवालयापर्यत करण्यासाठी किमान दहा-बारा दिवसाचा कालावधी लागतो.त्याशिवाय बांबू पासून तयार करण्यात येणाऱ्या हातऱ्या,मातीची मडकी व अन्य सामान तयार करावे लागते.या जत्रोत्सवासाठी बारा बलुतेदार सेवाजनाची सेवा आवश्यक असते.या सर्वाच्या सहकार्यानेच हा जत्रोत्सव संपन्न होतो.सद्या देवालयाचे पुर्नबांधणीचे काम सुरू आहे मात्र लॉकडाऊनमुळे बांधकाम पूर्ण होण्यास अडथळा निर्माण झाला आहे.हे बांधकाम पाषाणी दगडानी करण्यात येत आहे.या बांधकामासाठी भक्तजन,सेवाजन,महाजन व अन्य भाविकानी आर्थीक मदत करण्याचे आवाहन देवालय समितीने केले आहे.

संबंधित बातम्या