पोर्तुगीजांनी गोव्यात हिंदू सणांना बंदी घातली, लोकं चोरून घरात गणेशोत्सव साजरा करत

मांडवी नदीतील गणपती विसर्जनाचा फोटो
मांडवी नदीतील गणपती विसर्जनाचा फोटो ‘ए इंडिया पोर्तुगेझा’

प्रमोद यादव

विद्या आणि कलेची देवता, विघ्नहर्ता बाप्पा श्री गणेशाचे आगमण 31 ऑगस्ट रोजी घरोघरी होत आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्थी पर्यंत हा सण साजरा केला जातो. जगाच्या कानोकोपऱ्यात असलेले गणेशभक्त, गणपतीच्या आगमणाची आतुरतेने वाट पाहत असतात. 1892 ते 1894 या कालावधीत पुण्यात गणेशोत्सव साजरा करण्यास सुरूवात झाली. सर्वप्रथम भाऊ रंगारी आणि त्यानंतर लोकमान्य टिळकांनी त्याला व्यापक स्वरूप देण्याचे काम केले. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात गणेशोत्सव आनंदात साजरा केला जातो. गोव्यात देखील मोठ्या प्रमाणार साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात (Goa's Ganeshotsav) मोठी धुम पहायला मिळते. पण, एकेकाळी गोव्यात हिंदू सण साजरा करण्यावर अनेक बंधने होती. काही ठिकाणी कागदावर गणपतीचे चित्र रेखाटून, पेटीच्या दारावर गणपतीचे चित्र लावून पोर्तुगीजांपासून चोरी-छुपे पद्धतीने गणेशोत्सव साजरा करायचे. जुलमी अत्याचार सहन करून गोव्यातील जनतेने आपली संस्कृती आजवर जिवंत ठेवलीय. (Ganesh Chaturthi during Portuguese rule in Goa)

पोर्तुगीज काळातील धार्मिक विध्वंसाचे सत्र

कदंब काळापासून (Kadamba) गोव्यात गणेश पूजेचा इतिहास सापडतो. त्यानंतर गोवा इन्क्विझिशन (During Portuguese Inquisition all Hindu festivals were banned) द्वारे हिंदू सणांना बेकायदेशीर ठरवण्यात आले. पोर्तुगीजांनी धार्मिक विध्वंसाचे सत्र आरंभ करून गोव्यातल्या जनतेचे सक्तीने धर्मांतरण करण्याचा सपाटा लावला. याकाळात हिंदू मंदिरे पाडली, मूर्तिभंजन केले, सण उत्सवांवर बंदी घालणारे कायदे अधिक कडक करण्यात आले. जुनी हिंदू मंदिरे नष्ट करून, त्याजागी ख्रिस्तीधर्मियांच्या भव्य प्रार्थना मंदिरांची उभारणी करण्यात आली. जेझुईट संघाचा धर्मप्रसारक असणाऱ्या फ्रेंच पाद्री एतिएन -द-ला- क्रुवा यांनी सेंट पीटरचे पुराण या ग्रंथात श्री गणेशाचा उपहास व विपर्यास केला आहे. एकंदर हिंदूच्या धार्मिक भावना दुखावून गोवेकरांचे ख्रिस्तीकरण करण्याचा मोठी योजना पोर्तुगीजांनी आखली होती.

इन्क्विजिशनच्या दुष्ट आणि जुलमी कारभारात ख्रिस्तीधर्मप्रसारासाठी पोर्तुगीजांनी साम-दाम-दंड निती आरंभली. 1560 ते 1812 या काळात झालेल्या धर्मसभांद्वारे हिंदूंना छळण्यासाठी नवनवे जाचक नियम बनवले गेले. गोव्यातील सर्व देवळे, मशिदी जमीनदोस्त करण्यात आली, हिंदुधर्मीय उत्सवास मनाई, धार्मिक आचार, विधी पालन करण्यास मनाई करण्यात आली. ज्या हिंदूंनी ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिला त्यांना कठोर निर्बंधांचा सामना करावा लागला. निर्बंध असूनही हिंदू गोवा आपल्या धर्माचे पालन करत राहिले.

पोर्तुगीज काळातील गणेशोत्सवाबाबत लिखाण करणारे जेष्ठ पत्रकार राजेंद्र केरकर लिहतात. "तिसवाडीतल्या (Tiswadi) दीपवती बेटावरच्या नावेलीचे आराध्य दैवत असणाऱ्या महागणपतीचे समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न पोर्तुगीजांनी केला. परंतु नावेलीवासीयांनी प्रारंभी खांडेपार आणि कालांतराने खांडोळ्यात महागणपतीची प्रतिष्ठापना करून, आपला भक्तिभाव चिरंतन राखला. गोव्याला लागूनच असलेल्या प्रांतात छत्रपती शिवाजी महाराज (Chh. Shivaji Maharaj), त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज (Chh. Sambhaji Maharaj) यांची धास्तीही पोर्तुगीजांना होती. त्यामुळे काहीसी मवाळ भुमिकाही नंतरच्या काळात पोर्तुगीजांनी घेतली.

पत्री पूजा, कागदावरचा गणपती आणि तांदळाचा गणपती

पोर्तुगीजांच्या धाडीपासून बचावासाठी गोवेकर कागदावर चित्र रेखाटून गणेशोत्सव साजरा करायचे (काणकोण), आजही काही ठिकाणी ही प्रथा असल्याचे इतिहासकार सांगतात.

पत्री पूजा म्हणजे विविध वनस्पतींची पाने आणून त्याची पूजा केली जाते. काणकोण, पैंगण, केपे या भागात आजही पत्री गणपती पूजेची प्रथा आहे. ही पत्री पूजा मूर्ती पूजा सुरू व्हायच्या पूर्वी तसेच, पोर्तुगीज राजवटीतील जुलमापासून बचावासाठी योजलेल्या धार्मिक परंपरेचे प्रतिक असू शकते. याशिवाय तांदळापासून गणपतीची प्रतिकृती करून त्याची पूजा करण्याची प्रथा देखील काही भागात आढळून येते.

‘ए इंडिया पोर्तुगेझा’

1886 साली प्रकाशित झालेल्या लॉपिस मेंडिस यांच्या ‘ए इंडिया पोर्तुगेझा’ (A India Portuguesa) या ग्रंथात तसेच, पोर्तुगीज राजवटीत न्यायाधीश म्हणून कार्यरत असणाऱ्या ब्रागांझ परेरा यांनी 1940 साली पोर्तुगीज भाषेत प्रकाशित केलेल्या ग्रथांत गोव्यातील तसेच दीव दमण येथील गणेशोत्सव आणि संस्कृतीचा धांडोळा घेण्यात आला आहे. लॉपिस मेंडिसच्या ग्रंथात रायबंदर येथील गणपती विसर्जनाचा फोटो प्रसिद्ध केला आहे. मूर्ती होड्यात घालून, किनाऱ्यापासून दूर खोल पाण्यात गणपती विसर्जनाचा हा फोटो आहे. यावरून त्याकाळातील गणेशोत्सवाचा काहीसा अंदाज बांधता येऊ शकतो.

एकंदर पोर्तुगीजांना 450 वर्षाहून अधिक काळ गोव्यावर सत्ता गाजवली. या जुलमी राजवटीत त्यांनी गोवेकरांवर प्राणंतिक अत्याचार केले. सक्तीचे धर्मातंर असो की धार्मिक श्रद्धा, पंरपरा मोडीत काढण्याचे प्रयत्न केले. या काळात संतप्त गोवेकरांनी अनेक उठाव केले बंड केले पण, बळाच्या जोरावर पोर्तुगीजांनी ती बंड मोडीत काढली. अशा असंतोषाच्या काळात येथील स्थानिकांनी आपली संस्कृती, सण-उत्सव जीवंत ठेवण्याचे काम केले. परकी आक्रमणापुढे शरणागती न पत्कारता स्थानिकांनी आपली अस्मिता जपली. अखेर आपली सत्ता टिकवण्यासाठी पोर्तुगीजांनी नंतर काहीसी मवाळ भुमिका घेतली. आता गोव्यात सण-उत्सवाचा एकसमानतेचा सूर दिसून येतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com