सडा कचरा प्रकल्प बनला पांढरा हत्ती  

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

हेडलॅन्ड सडा कचरा विल्हेवाट प्रकल्पात अशा प्रकारे कचऱ्याचे डोंगर निर्माण झाले आहेत.

सरकारच्या करोडो रुपयांची उधळपट्टी : कुंपण कोसळून कचरा रस्त्यावर

एमपीटी कॉलनी येथील प्रभाग १ मध्ये हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. सद्या या प्रकल्पात कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने लाखो टन कचरा विखरून पडलेला आहे.

मुरगाव: हेडलॅन्ड सडा येथे मुरगाव पालिकेचा असलेला कचरा विल्हेवाट प्रकल्प पांढरा हत्ती बनला आहे. या प्रकल्पात साठवून ठेवलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करू, कचऱ्याची विल्हेवाट लावू अशी वल्गना करून राजकारणी गेल्या दहा बारा वर्षांपासून सरकारच्या करोडो रुपयांची नाहक उधळपट्टी करीत आले आहेत. हे पैसे कुठे गेले याचा थांगपत्ता लागत नसल्याचे, परिसरातून बोलले जात आहे.

प्रकल्प आवारात कचरा मावत नसल्याने संरक्षक भिंत भेदून कचरा प्रकल्पाबाहेर साचलेला आहे. याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याने भविष्यात मोठा बाका प्रसंग निर्माण होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मुरगावचे आमदार मिलिंद नाईक हे राज्याचे नगरविकास मंत्री आहेत. त्यांच्या अखत्यारीत मुरगाव पालिकेचा कचरा प्रकल्प येत आहे, परंतु तेही या प्रकल्पाला चालना देण्यासाठी अपुरे पडत आहे. दोन महिन्यांपूर्वी या प्रकल्पातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नव्याने पुढाकार घेतला जाईल अशी घोषणा मंत्री नाईक यांनी केली. पण आजपावेतो काहीच झालेले नाही. नगराध्यक्ष नंदादीप राऊत या प्रकल्पातील कचऱ्यावरून बायोगॅस निर्मिती केली जाईल अशी घोषणा गेल्या आठ महिन्यांपासून करीत आहेत. एकूण सडा येथील कचरा विल्हेवाट प्रकल्पाचे भांडवल होत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

सडा कचरा प्रकल्पातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने यापूर्वी दिला होता. याकामी हयगय केल्यास पालिकेचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी लवादाने गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश दिले होते. त्यानुसार मुरगाव पोलिसांकडे तक्रारही करण्यात आली पण मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांवर मात्र आत्तापर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही. पालिकेतील या जबाबदार अधिकाऱ्यांना कसलीच भीती नसल्याने त्यांनी सडा येथे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कचऱ्यावर उपाययोजना आखण्याच्या बाबतीत कोणतीच पावले उचलली नाही.

चौदाव्या वित्त आयोगाचे सात कोटी रूपये नवीन कचरा विल्हेवाट प्रकल्प थाटण्यासाठी राखून ठेवल्याचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत सांगतात. पण हा प्रकल्प कधी साकारणार हे मात्र ते सांगत नाहीत. कला आणि संस्कृती खात्याकडे असलेली १० हजार चौरस मीटर अतिरिक्त जमीन मुरगाव पालिकेला मिळाली आहे. त्या जमिनीत बायोगॅस निर्मिती प्रकल्प थाटण्याची योजना मंत्री नाईक यांनी आखलेली आहे. त्यासाठी जागेची पाहणी सुद्धा त्यांनी केली आहे, परंतु अजून प्रकल्प थाटण्यास मुहूर्त सापडत नाही.

हेडलॅन्ड सडा येथील कचरा विल्हेवाट प्रकल्पाच्या सभोवताली असलेले चिरेबंदी कुंपण कोसळण्याची घटना वारंवार घडत आहे. त्यानंतर कोसळलेले कुंपण पुन्हा उभारण्यासाठी लाखो रुपयांचा चुराडा केला जातो. सद्यस्थितीत कुंपण कोसळून कचरा रस्त्यावर आला आहे.पण अद्याप कुंपण नव्याने बांधले जात नाही.या कचरा प्रकल्पातून चोर मार्गाने स्क्रॅप घेऊन जाण्याचाही प्रकार उघडकीस आला आहे.रात्रीच्या वेळी चिखली, बोगमळो, सांकवाळ भागातीलही कचरा नकळत आणून टाकला जात आहे. एकूण हेडलॅन्ड सडा येथील कचरा विल्हेवाट प्रकल्प राजकारण्यांना आर्थिकदृष्ट्या मदतशीर ठरलेला असल्याचे परिसरातून बोलले जात आहे.

 

स्थानिक स्वराज्य संस्थांत दुहेरी खाते पद्धती असावी

 

संबंधित बातम्या