गिरीश महाजनांचा ठेका अन्‌ पोलिस निरीक्षकाची दौलतजादा !

IANS
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

नाशिक : बाप्पांच्या निरोपासाठी नाशिकमध्ये वाकडी बारवपासून निघालेल्या मुख्य मिरवणुकीत चिमुकल्यांस

नाशिक : बाप्पांच्या निरोपासाठी नाशिकमध्ये वाकडी बारवपासून निघालेल्या मुख्य मिरवणुकीत चिमुकल्यांसमवेत लेझीम खेळून, ढोल वाजवून अन्‌ ढोलच्या तालावर ठेका धरत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आनंद लुटला. राज्याचे मंत्री नाचताहेत म्हटल्यावर भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांनाही पालकमंत्र्यांवर नोट ओवाळण्याचा मोह आवरला नाही. हे कमी काय म्हणून श्री. सूर्यवंशी यांनी कमरेला रिव्हॉल्व्हर लावलेल्या स्थितीत ढोलच्या तालावर कार्यकर्त्यांसमवेत ठेका धरला. 

गुलालवाडी व्यायामशाळेच्या चिमुकल्यांसमवेत पालकमंत्री महाजन लेझीम खेळले. त्यानंतर त्यांनी ढोल वाजवला. पुढे मग पालकमंत्र्यांनी नृत्यासाठी पोझ घेताच त्यांच्या शेजारी उभे राहून पोलिस निरीक्षकांनी बंडलमधील नोटा मोजल्या. त्यातील एक नोट काढून पालकमंत्र्यांना ओवाळणी केली. क्षणात ही गोष्ट लक्षात येताच पालकमंत्र्यांनी त्यांना रोखले. इथून त्यांनी काढता पाय घेतला असताना पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत नृत्य सुरू राहिले. कार्यकर्ते नाचण्यात दंग होताच पालकमंत्री जामनेरकडे रवाना झाले.

या घटनेला बराच वेळ झाला असताना श्री. सूर्यवंशी यांच्याकडून नोटांची ओवाळणी सुरू राहिली. उत्साही कार्यकर्त्यांकडून नोटांची ओवाळणी होतेय म्हटल्यावर श्री. सूर्यवंशी यांनीही नोटा बाहेर काढल्या. सुरवातीला फेट्यावर नोटांची ओवाळणी करणाऱ्या सूर्यवंशींनी नंतर सफेद टोपी डोईवर परिधान करून दौलतजादा सुरूच ठेवली. मात्र, नंतर त्यांनी कमरेला असलेले रिव्हॉल्व्हर कायम ठेवून कार्यकर्त्यांसमवेत ठेका धरल्यावर त्यांच्या डोक्‍यावर टोपी नव्हती. ही सारी ठळक दृश्‍ये कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. 

संबंधित बातम्या