टॅक्सी व्यावसायिकांना १२ हजारांचे पॅकेज द्या

टॅक्सी व्यावसायिकांना १२ हजारांचे पॅकेज द्या

पणजी,

‘कोविड-१९’मुळे लॉकडाऊन लागू करण्यात आल्यापासून राज्यातील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. पर्यटकांवर अवलंबून असलेला गोव्याचा पारंपरिक टॅक्सी व्यवसाय अडचणीत आला आहे. या टॅक्सी व्यावसायिकांचा उदारनिर्वाह टॅक्सी व्यवसायावर चालतो त्यामुळे सरकारने या टॅक्सी मालकांना किमान बारा हजार रुपयांचे पॅकेज देण्याची मागणी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करून कशाप्रकारे मदत करता येईल याबाबत योग्य निर्णय घेतो, असे आश्‍वासन उत्तर गोवा टॅक्सी मालक संघटनेला दिले आहे.
गोव्याचा हा पारंपरिक टॅक्सी व्यवसाय अनेकजण रोजगार म्हणून करत आहे. सरकारी किंवा खासगी कंपन्यांमध्ये नोकऱ्या राज्यात सर्वांनाच उपलब्ध नसल्याने काही शिक्षित तरुण या व्यवसायाकडे वळले आहे. काहीजणांनी बँकेतून कर्जे घेऊन टॅक्सी घेतली आहे. बहुतेकांकडे एकच टॅक्सी आहे व त्यावरच त्यांचे कुटुंब अवलंबून असते. या व्यवसायातून कुटुंब चालविण्याबरोबरच टॅक्सीचा विमा व परवान्याचे नुतनीकरण तसेच कर्जाचे हप्ते हे फेडायचे असतात. आता तर गेला एक महिन्याहून अधिक काळ लॉकडाऊन सुरू आहे. पर्यटकही नाहीत त्यामुळे या टॅक्सी मालकांसमोर पैशांची चणचण भासू लागली आहे. कुटुंबाचा उदारनिर्वाह करणेही मुष्कील बनले आहे. किनारपट्टी परिसरातील स्थानिक आमदार व मंत्री मायकल लोबो तसेच आमदार जयेश साळगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना टॅक्सी मालक संघटनेची समस्या मांडली आहे. आमदार व मंत्र्यांकडून टॅक्सी मालक संघटनेला पाठिंबा आहे. मुख्यमंत्र्यांकडे आम्हाला मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे, त्यामुळे संघटनेला सरकारकडून काही तरी मदत होईल अशी आशा आहे, असे उत्तर गोवा टॅक्सी मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
किनारपट्टी परिसरात तसेच दाबोळी विमानळ या ठिकाणी पर्यटकांना ने - आण करण्यासाठी टॅक्सीचा वापर होतो. मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी पर्यटक गोव्यात येत असतात. दरवर्षी मार्च ते मे महिन्याअखेरीपर्यंत पर्यटन व्यवसाय तेजीत असतो. देशी व विदेशी मिळून सुमारे ४० लाख पर्यटक गोव्याला भेट देत असतात. मात्र त्याच काळात कोविड - १९ मुळे लॉकडाऊन लागू झाल्याने पर्यटक गोव्यात आले नाहीत. राज्याच्या सर्व सीमा व आंतरराज्य बससेवा व विमान सेवा, आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद झाल्याने पर्यटनावर अवलंबून असलेले सर्व व्यवसाय बंद झाले आहेत. त्याचा मोठा फटका हा टॅक्सी व्यवसायाला बसला आहे. हा व्यवसाय राज्यातील
लॉकडाऊन येत्या ३ मे पर्यंत उठविला तरी त्याचा फायदा या व्यवसायाला होणार नाही. त्यामुळे यावर्षीचा पूर्ण पर्यटन व्यवसाय बुडीत गेला आहे. त्यामुळे या टॅक्सी मालकांचे कुटुंब आता सरकारकडून मिळणाऱ्या मदतीवरच अवलंबून आहे. राज्याला केंद्राकडून कोविड - १९ खाली जी मदत मिळणार आहे त्यातून या टॅक्सी मालकांना मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्याने दिली.

कर्जाचे हप्ते भरण्यात
सरकारने सूट द्यावी...
राज्यात काळ्या-पिवळ्या टॅक्सी, खासगी टॅक्सी तसेच गोवा माईल्स टॅक्सी मिळून सुमारे २५ हजार टॅक्सी राज्यात पर्यटन काळात सेवेत असतात. मात्र लॉकडाऊनच्या काळात या सर्व टॅक्सी जागावरच उभ्या आहेत. त्यामुळे टॅक्सीसाठीचा विमा तसेच परवानाच्या नुतनीकरणामध्ये तसेच कर्जाच्या हप्ते भरण्यामध्ये सरकारने सूट द्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. कुटुंबाचा उदारनिर्वाहच चालविणे शक्य नाही. कर्जाचे हप्ते तुंबल्यास बँकेकडून टॅक्सी वाहनावर जप्ती येईल, अशी भीती या संघटनेने व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com