बेन्झ कंपनीची जगातील पहिल्या मॉडेलची मोटारगाडी मडगावात

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

जगातील पहिल्या मॉडेलची मोटारगाडी मडगावात आहे. ही मोटारगाडी घोडागाडी किंवा सायकलसारखी दिसली, तरी बेन्झ कंपनीची मोटर वेगन गाडी 1886 सालची आहे.

फातोर्ड: जगातील पहिल्या मॉडेलची मोटारगाडी मडगावात आहे. ही मोटारगाडी घोडागाडी किंवा सायकलसारखी दिसली, तरी बेन्झ कंपनीची मोटर वेगन गाडी 1886 सालची आहे. ही गाडी उद्योजक प्रदीप नायक यांच्या नुवे येथील आश्र्वेक विंटेज वर्ल्ड संग्रहालयात प्रदर्शनार्थ ठेवण्यात आली आहे. सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या वाहनांच्या संग्रहालयाला भेट दिली व विविध प्रकारच्या जुन्या मोटारगाड्यांची माहिती करून घेतली.
ही मोटारगाडी अजून चांगल्या स्थितीत असून ती रस्त्यावरूनही चालविणे शक्य आहे. 

या संग्रहालयात नायक यानी संग्रहित केलेली अनेक जुनी वाहने आहेत. प्रदर्शनार्थ जरी २२ वाहने ठेवलेली असली, तरी त्यांच्याकडे आणखी ४० ते ५० जुनी वाहने आहेत. आपल्याला या सर्व गाड्या प्रदर्शनार्थ ठेवण्यासाठी मोठ्या जागेची आवश्यकता आहे, असे नायक यांनी या प्रतिनिधीला सांगितले.

दोन इंजिनांचाही टेम्‍पो संग्रही
त्यांच्या या संग्रहालयात पुढे व पाठीमागे दोन इंजिने असलेली विदाल टेम्पो जी १२०० नावाची मोटारगाडी आहे. शिवाय मर्सिडीसची अनेक मॉडेल, मॉरीस मायनर, ऑस्टिन, अॅम्बासेडर, फियाट, वॉक्सवेगन,  कंपन्यांच्या गाड्या, लॅम्बरेटा, चेतक, प्रिया या दुचाकीसुद्धा प्रदर्शनार्थ ठेवलेल्या आहेत. तसेच प्रसिद्ध कार्टुनिस्ट मारियो मिरांडा यांनी एका मॉरिस मायनर गाडीवर वेगवेगळे कार्टुन चित्रीत केले आहे. 

गाड्यांच्‍या परिचयासाठी ‘रॅली’
मी या जुन्या गाड्यांचा लोकांना परिचय व्हावा म्हणून रॅली आयोजित केल्या. पहिली रॅली ४ एप्रिल २००४ रोजी मडगावात आयोजित केली. गेल्या १५ वर्षांत अशा पाच रॅलींचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. गोवा पर्यटन  विकास कोर्पोरेशनने आयोजित केलेल्या विंटेज कार्स रॅलीचे आपण दोनवेळा क्युरेटर म्हणून जबाबदारी सांभाळली, असेही त्यांनी सांगितले.

गोव्यात आजपासून कोरोनाविरोधी लसीचा दुसरा टप्पा -

क्‍लबचीही स्‍थापना
गोव्यात व देशात जुन्या गाड्या संग्रहित करण्याचा अनेकांना छंद जडला आहे. त्यामुळे गोवा व्हिंटेज क्लासिक ऑटोमोबाईल क्लबची स्थापना केली आहे. या क्लबचे ९६ सदस्य आहेत. जुन्या गाड्यांसंबंधीच्या विचारांचे आदानप्रदान होते, असेही प्रदीप नायक यांनी सांगितले.

२३ वर्षांपासून छंद जडला
मी २३ वर्षांचा असताना जुन्या गाड्या संग्रहित करण्याचा छंद जडला. माझे काका मोहनदास नायक यांनी त्‍यावेळी जुनी मर्सिडीस गाडी आणली व नंतर कार्रेर आणून ठेवली. सुरवातीला या गाड्या कशासाठी आणाव्यात, असा प्रश्र्न मला पडला होता. पण, नंतर हळूहळू जुन्या गाड्या विकत घेण्याच्या मोहात मी पडलो. सर्वप्रथम महाराष्ट्राचे माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या मदतीने मी १९३१ सालची पिजॉट गाडी ३००० रुपयांत खरेदी केली. ही गाडी मी दाणोली-सावंतवाडी येथील सद्‍गुरु साटम महाराज यांच्याकडून घेतली होती, असे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या