भाजप अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेशाध्‍यक्षपदी प्रभाकर गावकर

अवित बगळे
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

२००३ मध्ये अनुसूचित जातींना तो दर्जा मिळाला. मागण्यांसाठी नंतर भूमिपूत्रांना २०११ पर्यंत संघर्ष करावा लागला. २०१२ मध्ये भाजपचे सरकार आले आणि बहुतांश प्रश्न सुटले.

पणजी

भारतीय जनता अनुसुचित जमाती मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रभाकर गावकर यांनी निवड झाल्याचे आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी या मोर्चाचे मावळते प्रदेशाध्यक्ष विठोबा वेळीप हे उपस्थित होते.
तानावडे म्हणाले, मतदान केंद्र समित्या, मंडळ समित्या, जिल्हा, राज्यस्तरीय समित्या नेमल्या गेल्या आहेत. अन्य विभागांच्या समित्या कोविड महामारीच्या काळात नियुक्त करता आल्या नव्हत्या. नवी राज्य कार्यकारिणी अस्तित्त्‍वात आल्यावर सर्व अन्य विभाग (मोर्चा) आपोआप बरखास्त होतात. त्यामुळे त्यांची नव्याने नियुक्ती करावी लागते. त्यानुसार आज भारतीय जनता अनुसूचित जमाती मोर्चाची फेररचना करण्यात आली आहे. तिच्या प्रदेश अध्यक्षपदी प्रभाकर गावकर यांची नियुक्ती केली आहे. गावकर यांनी केपे मतदारसंघात भाजपचे अनेक वर्षे काम केले आहे. ते आता जिल्हा समिती, मतदारसंघ समित्या आणि प्रदेश कार्यकारिणी नियुक्त करणार आहेत.
प्रदेश उपाध्यक्ष रमेश तवडकर म्हणाले, सर्व पातळीवरील कार्यकर्ते यात सहभागी करून घेतले जात आहेत. २००३ मध्ये अनुसूचित जातींना तो दर्जा मिळाला. मागण्यांसाठी नंतर भूमिपूत्रांना २०११ पर्यंत संघर्ष करावा लागला. २०१२ मध्ये भाजपचे सरकार आले आणि बहुतांश प्रश्न सुटले. मी आदिवासी कल्याणमंत्री असताना २५ योजना मार्गी लावल्या. अजूनही काही प्रश्न प्रलंबित आहेत, कल्याणकारी योजनांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. वनहक्क कायदा अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आहे, संजीवनी सहकारी कारखान्याचा प्रश्न आहे, हे सारे भारतीय जनता आदिवासी मोर्चाच्या माध्यमातून मार्गी लावण्याची संधी प्रभाकर गावकर यांना आहे. त्यांना माझे सदोदीत सहकार्य असेल.
विठोबा वेळीप यांनी प्रभाकर गावकर यांचे पुष्पगुच्छ देऊन यावेळी अभिनंदन केले. यावेळी राज्यसभा सदस्य विनय तेंडुलकर हेही उपस्थित होते.

संबंधित बातम्या