२०२० मध्ये युरोपातील उष्णतेत विक्रमी वाढ ; सर्वाधिक उष्णता असणारे वर्ष

PTI
सोमवार, 11 जानेवारी 2021

जगभरात २०२० या वर्षात कोरोनाने धुमाकूळ घातला. युरोपसाठी मात्र हे वर्ष आणखी एका कारणासाठी ऐतिहासिक ठरले.

बर्लिन :  जगभरात २०२० या वर्षात कोरोनाने धुमाकूळ घातला. युरोपसाठी मात्र हे वर्ष आणखी एका कारणासाठी ऐतिहासिक ठरले. युरोपसाठी हे वर्ष सर्वाधिक उष्ण ठरले. युरोपमध्ये हवामानाच्या नोंदी ठेवण्यास सुरवात झाल्यापासूनचे हे सर्वाधिक उष्ण वर्ष आहे. युरोपियन युनियनच्या ‘कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस’ने याबाबतची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार, २०२० चे तापमान २०१९ पेक्षाही ०.४ अंश सेल्सिअसने जास्त होते. केवळ युरोपच नव्हे तर संपूर्ण जगासाठीही २०२० हे वर्ष २०१६ प्रमाणे सर्वाधिक उष्ण ठरले, असेही या संस्थेने म्हटले आहे.

त्याचप्रमाणे, गेल्या दशकाची सर्वाधिक उष्ण दशक म्हणूनही नोंद झाली.  युरोपसाठी १८५० -१९०० या पूर्व-औद्यागिक काळापेक्षाही २०२० हे तब्बल १.२५ अंश सेल्सिअसने उष्ण ठरले. वैज्ञानिकांच्या मते, जागतिक तापमानवाढीचे सर्वाधिक वाईट परिणाम टाळण्यासाठी ती १.५ अंश सेल्सिअसरवरच रोखायला हवी. आर्क्टिक आणि सायबेरियाला २०२० मध्ये जंगलातील असामान्य वणव्यांचा सामना करावा लागला.

या दोन्ही प्रदेशांचा जगातील सर्वाधिक तापमानवाढीच्या प्रदेशात समावेश होतो, असेही ‘द कोपर्निकस’ ने आपल्या अहवालात म्हटले आहे.    जागतिक तापमानात सातत्याने वाढ होत आहे. हे वातावरणातील हरितगृह वायूंच्या वाढीशीही संबंधित आहे. वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाणही वाढत आहे. त्यात प्रामुख्याने कार्बन डायऑक्साईडचा समावेश आहे. कोळसा, तेलासारख्या जीवाश्म इंधनांच्या ज्वलनातून हा वायू उत्सर्जित आहे.

संबंधित बातम्या