इतिहासातील सर्वात सुरक्षित निवडणूक ; डोनाल्ड ट्रम्प यांचा गैरप्रकाराचा दावा निवडणूक आयोगाने फेटाळला

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा निवडणूक आयोगाने फेटाळून लावला. इतिहासातील ही सर्वांत सुरक्षित निवडणूक असल्याचे ठामपणे सांगण्यात आले.

वॉशिंग्टन :  अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा निवडणूक आयोगाने फेटाळून लावला. इतिहासातील ही सर्वांत सुरक्षित निवडणूक असल्याचे ठामपणे सांगण्यात आले.

निवडणूक सुरक्षा अधिकाऱ्यांनी तसे निवेदन केले आहे, जे सायबरसुरक्षा आणि पायाभूत सुरक्षा संस्थेच्या (सीआयएसए) संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले. गृह खात्याच्या अखत्यारीतील ही संस्था आहे. कोणत्याही मतदान यंत्रणेतून मते वगळली गेली किंवा ती हरवली, बदलली किंवा कोणत्याही प्रकारे तडजोड झाल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असे सांगण्यात आले. सरकारी तसेच प्रांतीय अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांच्या आरोपांना अत्यंत थेट प्रत्युत्तर दिले आहे. तसे निवेदन निवडणूक पायाभूत सुविधा सरकारी समन्वय मंडळाने जारी केले. गृह मंत्रालय तसेच अमेरिका निवडणूक सहाय्यता आयोग या दोन संस्थांच्या अधिकाऱ्यांसह प्रांतीय पातळीवरील अधिकाऱ्यांचाही या मंडळात समावेश आहे. या सर्वांनी निवडणूकीवर देखरेख केली.

या घडीला निवडणूक अधिकारी निकालास अंतिम रूप देण्यापूर्वी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा फेरआढावा तसेच दुहेरी तपासणी करीत आहेत. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे जा, असे सांगण्यात आले. 

ट्रम्प यांचा दावा
आपल्याला पडलेली २० लाख ७० हजार मते डिलीट झाल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे, पण त्यांना कोणताही पुरावा दिलेला नाही. मुख्य म्हणजे ट्रम्प यांनी डेमोक्रॅटीक उमेदवार ज्यो बायडेन यांच्याकडून पराभव झाल्याचे अद्याप मान्य केलेले नाही. तीन नोव्हेंबरच्या निवडणूकीचा निकाल अमेरिकीतील सर्व प्रमुख वृत्तवाहिन्यांनी गेल्याच आठवड्यात जाहीर केला. ट्रम्प मात्र महत्त्वाच्या  प्रांतांमध्ये कायदेशीर आव्हाने देत असून सार्वत्रिक गैरप्रकारांचा दावा करीत आहेत.

सीआयएस प्रमुखांवर नाराजी
ख्रिस्तोफर कर्ब्स हे ‘सीआयएसए-चे प्रमुख आहेत. या संस्थेच्या संकेतस्थळावर रुमर कंट्रोल हा एक विभाग आहे. त्यात निवडणूकीविषयी चुकीच्या माहितीचे खंडन केले जाते. याच संदर्भात व्हाइट हाउसने केर्ब्स यांच्यावर नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. स्वतः केर्ब्स यांनी डेव्हिड बेकर या निवडणूक कायदेतज्ज्ञाचे ट्विट रिट्विट केले. मतदान यंत्रांबाबत कोणत्याही स्वैर आणि निराधार दाव्यांवर कृपा करून विश्वास ठेवू नका, जरी ते अध्यक्षांनी केलेले असले तरी...असे हे ट्विट आहे.
 

संबंधित बातम्या