ऐतिहासिक दिवस.. मार्गारेट आजींना टोचण्यात आली जगातील पहिली लस

गोमंतक ऑनलाईन टीम
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

आज 90 वर्षांच्या एका वयोवृद्ध महिलेला पहिली लस टोचण्यात आली. वैद्यकीय चाचण्यांव्यतिरिक्त कोविडची लस घेणारी ही जगातील पहिलीच व्यक्ती असून तिचे नाव मार्गारेट किनन असे आहे.

लंडन- इंग्लंडमध्ये आजपासून ऐतिहासिक लसीकरणाला सुरूवात झाली. यांतर्गत आज 90 वर्षांच्या एका वयोवृद्ध महिलेला पहिली लस टोचण्यात आली. वैद्यकीय चाचण्यांव्यतिरिक्त कोविडची लस घेणारी ही जगातील पहिलीच व्यक्ती असून तिचे नाव मार्गारेट किनन असे आहे. मार्गारेट याच महिन्यात 91व्या वर्षात पदार्पण करत असल्याने त्यांना अनोखी वाढदिवसाची भेट मिळाली आहे. मार्गारेट यांच्या पतीचे एप्रिलमध्ये कोविडमुळे निधन झाले होते.   

दरम्यान, या आठवड्यात 8 लाख लस टोचल्या जाणार असून या महिन्याच्या अखेरीस आणखीन 4 लाख टोचल्या जाणार आहेत. फायजर बायोटेक या कंपनीने तयार केलेली ही लस सर्वप्रथम 80 वर्षांवरील व्यक्ती तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली जाणार आहे. देशातील एकूण 70 रूग्णालयांमध्ये या आठवड्यात ही लस देण्यात येणार आहे. कोविड काळाच्या आधीचे आयुष्य पूर्ववत होण्यासाठी ही लस अधिक महत्वाची मानली जात आहे. 

आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी याबाबत म्हटले की, 'मंगळवार हा V-DAY आहे. आज पहिल्या लसीकरणाचे दृश्य बघणे हे अत्यंत उत्कंठावर्धक आहे. लसीकरण सुरू झाले असले तरीही पुढील काही महिने आपल्याला नियमांचे पालन करावे लागणार आहे.'

पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनीही आज या पहिल्या लसीकरणाला हजेरी लावली. पहिल्या काही लोकांच्या लसीकरणाला त्यांनी स्वत: उपस्थिती लावत लस घेतलेल्यांशी हितगुजही साधला. ते म्हणाले, 'लस घेणे हे तुमच्यासाठी आणि सबंध देशासाठी फायद्याचे आहे.'  
 

 

संबंधित बातम्या