अफगाणिस्तानकडून तालिबानबरोबरील पेच सोडवण्यासाठी शिष्टमंडळ

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

तालिबानबरोबर कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करायची आणि शांतता करारावर स्वाक्षरी करायची की नाही याचा अंतिम निर्णय हे मंडळ घेईल.

काबूल: अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी राष्ट्रीय सलोख्यासाठी एका उच्चस्तरीय मंडळाची स्थापना केली आहे. तालिबानबरोबर कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करायची आणि शांतता करारावर स्वाक्षरी करायची की नाही याचा अंतिम निर्णय हे मंडळ घेईल.

तालिबानी दहशतवाद्यांबरोबरील वाटाघाटींची प्रक्रिया वेळखाऊ आणि अनिश्चित असण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीत अमेरिका आणि तालिबान यांच्यात करार झाला होता. त्यावेळी युद्धग्रस्त देशाचे भवितव्य ठरवण्यासाठी आंतर-अफगाण चर्चा करायचे ठरले होते, जी या महिन्याच्या प्रारंभीच सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र त्यास विलंब होत असल्यामुळे अमेरिकी प्रशासन नाराज झाले आहे. 

गेल्या वर्षी निवडणूकीनंतर राजकीय पेच निर्माण झाला होता. डॉ. अब्दुल्लाह अब्दुल्लाह यांनीही आपण विजयी झाल्याचा दावा केला होता. अखेरीस घनी यांनी त्यांच्याशी सत्तावाटपाचा करार केला.

तालिबानची पसंती...
अशा मंडळाची स्थापना तालिबानला कदाचित पसंत पडणार नाही. तालिबानने 20 सदस्यांचे एकच मंडळ स्थापन केले आहे, जे केवळ त्यांचा म्होरक्या मुल्लाह हबीतुल्लाह अखुनझादा यालाच बांधील आहे.

कैदी-कमांडोंची सुटका
अफगाण सरकारने 320 कैद्यांची सुटका लांबणीवर टाकली आहे. तालिबाननने आपले कमांडो सोडावेत अशी सरकारची मागणी आहे. यावरूनच शांतता चर्चा ठप्प झाली आहे.

अमेरिकी सैन्य परततेय
दरम्यान, फेब्रुवारीच्या अखेरीस तालिबानबरोबरील करारानंतर अमेरिकी सैन्य परतण्यास प्रारंभ झाला आहे. त्यावेळी 13 हजार सैनिक होते, जे नोव्हेंबरपर्यंत आता पाच हजारपेक्षा कमी असण्याची अपेक्षा आहे.

अफगाण सैनिकांवर हल्ले
अमेरिकेबरोबरील करारानुसार तालिबानने अमेरिका आणि नाटो सैन्यावर हल्ले न करण्याचे वचन पाळले आहे. अफगाण सुरक्षा दलांच्या सैनिकांवर मात्र सतत हल्ले केले जात आहेत. अफगाण सरकारला तातडीने शस्त्रसंधी हवी आहे, तर कराराच्या अटींची पूर्तता करावी असा तालिबानचा आग्रह आहे. तालिबानच्या हल्ल्यात नागरिकांचाही बळी जात असून अनेक वेळा यात महिला आणि लहान मूलांचा समावेश असतो. तालिबानने अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही दहशतवादी हल्ले केले होते.

असे आहे मंडळ

  • 46 सदस्यांचा समावेश
  • घनी यांची पूर्वाश्रमीचे विरोधक डॉ. अब्दुल्लाह अब्दुल्लाह यांचाही समावेश
  • डॉ. अब्दुल्लाह सध्या सरकारमध्ये सहभागी
  • घनी यांनी मार्च महिन्यात वाटाघाटींसाठी नेमलेल्या 21 सदस्यांच्या उच्च मंडळापेक्षा हे मंडळ वेगळे
  • उच्च मंडळात नऊ महिला, यातील एक डॉ. अब्दुल्लाह यांच्या सहकारी
  • माजी अध्यक्ष हमीद करझाई यांनी सदस्यत्व नाकारले
  • 1980च्या दशकात सोव्हिएत महासंघाविरुद्ध लढलेल्या मुजाहिदीन, जिहादी नेत्यांचाही समावेश
  • घनी यांच्याशी 2016 मध्ये शांतता सौदा केलेल्या गुलबुद्दीन हीकमतयार याचाही समावेश, ज्याला पूर्वी अमेरिकेने दहशतवादी घोषित केले होते

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या