ॲपवरील भारताच्या कारवाईनंतर चीनचा थयथयाट

Dainik Gomantak
बुधवार, 1 जुलै 2020

आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचे हित जपा

बीजिंग

चीनच्या सीमेवरील कुरापतींना सडेतोड उत्तर देण्यासाठी भारताने ड्रॅगनवर डिजिटल स्ट्राइक करीत ५९ चिनी ॲपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारच्या या कारवाईनंतर चीनच्या नाकाला मिरच्या झोंबल्या असून, आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचे हितरक्षण करण्याची कायदेशीर जबाबदारी ही भारताची असल्याचे चीनने म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी म्हटले आहे की, ‘‘भारत सरकारच्या ताज्या कृत्याने आम्ही चिंतित झालो असून, सध्या आम्ही परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहोत. चीन सरकार हे त्यांच्या उद्योजकांना परदेशात उद्योग करण्यापूर्वी नेहमी आंतरराष्ट्रीय, स्थानिक कायदे आणि नियमांचे पालन करण्याचे निर्देश देत असते. भारत सरकारची देखील अशा स्थितीत जबाबदारी आहे, की त्यांनी आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचे हित जपावे, यामध्ये चिनी उद्योगांचाही समावेश होतो. भारत आणि चीन यांच्यातील वास्तविक सहकार्य हे दोन्ही बाजूंसाठी विन विन अशा स्वरूपाचे आहे. याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून, ते भारताच्या हिताचे नाही.’’

भारत-चीनमध्ये पुन्हा चर्चा
नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेला लष्करी तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनच्या लष्करांतील लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये आज पुन्हा तिसऱ्या टप्प्यातील चर्चा पार पडली. हा तणाव कमी करण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे, याबाबतही या बैठकीत खल करण्यात आला. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबारेषेवरील चुशूल सेक्टरमध्ये ही चर्चा पार पडली. याआधी लष्करी अधिकाऱ्यांमध्ये दोन टप्प्यांत चर्चा पार पडली असून, त्यामध्ये भारतीय बाजूकडून सीमेवर ‘जैसे थे’ स्थिती ठेवावी, अशी बाब मांडण्यात आली. गलवान खोरे, पँगॉग त्सो या भागांतून चीनने तातडीने लष्कर माघारी घ्यावे, अशी भूमिकाही भारताकडून ठामपणे मांडण्यात आली.

फ्रान्सचा भारताला पाठिंबा
चीनसोबतचा संघर्ष अधिक तीव्र झाला असताना फ्रान्सने आज भारताला पाठिंबा देऊ केला आहे. फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी गलवान खोऱ्यात हुतात्मा झालेल्या जवानांप्रति सहानुभूती व्यक्त करणारे पत्र देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांना लिहिले आहे. भारत हा फ्रान्सचा रणनैतिक मित्र असून, हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत, असे सांगत त्यांनी याच मुद्द्यावरून संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेण्याची तयारी दर्शविली आहे.

टिकटॉकची सरकारकडे धाव
टिकटॉक ॲपच्या भारतातील प्रमुखांनी येथील डेटा चीन किंवा इतर देशांना पुरविला जात नसल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, भारताच्या निर्णयावर सरकारी मालकीचे वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने आगपाखड केली आहे. भारताचा निर्णय अमेरिकेची नक्कल असल्याचे म्हणत, या बंदीचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेलाच बसेल, अशी दर्पोक्तीही या वृत्तपत्राने केली आहे. टिकटॉकचे भारतीय प्रमुख निखिल गांधी यांनी आज निवेदनाद्वारे सांगितले की, ‘‘कंपनीला आपले म्हणणे सरकारकडे मांडण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, टिकटॉक कंपनीचा डेटा पूर्णपणे सुरक्षित आहे.’’
 

संबंधित बातम्या