अफगाणिस्तानच्या हल्ल्यात ४५ हून अधिक जण ठार

PTI
शुक्रवार, 24 जुलै 2020

तुरुंगातून सुटलेल्या एका तालिबानी दहशतवाद्याच्या स्वागतासाठी हेरतमधील अद्रस्कान जिल्ह्यात मोठ्या संख्येने लोक जमले असतानाच हा हल्ला करण्यात आला.

काबूल

अफगाणिस्तान सरकारने हेरत प्रांतात तालिबानविरोधात केलेल्या कारवाई ४५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आठ जण सामान्य नागरिक असून त्यात महिला आणि बालकांचा समावेश असल्याचे हेरत प्रशासनाने सांगितले आहे.
तुरुंगातून सुटलेल्या एका तालिबानी दहशतवाद्याच्या स्वागतासाठी हेरतमधील अद्रस्कान जिल्ह्यात मोठ्या संख्येने लोक जमले असतानाच हा हल्ला करण्यात आला. सरकारच्या म्हणण्यानुसार, येथे मोठ्या संख्येने तालिबानी दहशतवादी जमले असल्याने त्यांच्यावर विमानातून बाँब टाकण्यात आले. या हल्ल्यात ठार झालेल्या ४५ जणांपैकी आठ सामान्य नागरिक असले तरी उर्वरित ३७ जणांमध्येही किती दहशतवादी होते, याबाबत खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई हल्ल्याच्या दोन फेऱ्या झाल्या. या हल्ल्याचा सामान्य नागरिकांनी निषेध केला आहे. शिक्षा भोगून परत आलेल्या आणि सामान्य जीवन जगण्याची इच्छा बाळगणाऱ्यांना पुन्हा दहशतवादाच्या मार्गावर आणण्याचा हा प्रकार असल्याची टीका केली जात आहे. अनेक मानवाधिकार संघटनांनीही अफगाणिस्तान सरकारच्या या कारवाईचा निषेध केला आहे. सरकारने मात्र याबाबत सावध प्रतिक्रिया देताना हल्ल्याची चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले आहे.
अमेरिकेनेही या हल्ल्याची निंदा केली आहे. या हल्ल्यामुळे तालिबानबरोबर सुरु असलेल्या शांतता चर्चेला अडथळा निर्माण झाला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या