बेलग्रेडमध्ये चौथ्या दिवशीही निदर्शने

Avit Bagle
रविवार, 12 जुलै 2020

सर्बियन सरकारविरुद्ध आंदोलकांची संसदेवर धडक

बेलग्रेड

कोरोना संसर्ग नियंत्रणात सरकार अपयशी ठरत असून लॉकडाउनच्या निषेधार्थ बेलग्रेडमध्ये सलग चौथ्या दिवशी निदर्शने झाली. संसदेत धडक मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला.
अध्यक्ष अलेक्झांडर वुचिच यांच्या सरकारविरुद्ध जनतेत संतापाची भावना आहे. यास वाट मोकळी करून देत लोकांनी जमावबंदीचा आदेश झुगारून दिला. संसदेच्या इमारतीसमोर बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांवर लोकांनी बाटल्या, दगड फेकले. लाकडी दांडके पेटवून त्याचाही मारा करण्यात आला. आंदोलकांनी लोखंडी अडथळे ढकलून आगेकूच केली. पोलिसांनी अनेकांची धरपकड केली आहे. त्याठिकाणी वार्तांकनासाठी आलेले अनेक पत्रकारही जखमी झाले.
आंदोलकांनी वुचीच यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. वुचीच यांनी मात्र सत्ता गमावण्याची चिंता वाटत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सर्बियाच्या पंतप्रधान अॅना ब्रनाबीच यांनी सांगितले की, आजारी लोकांमुळे रुग्णालये भरली आहेत. संसर्ग नियंत्रणात यावा म्हणून लोकांनी निर्बंधांचे पालन करावे.

लोकांना निदर्शनांसाठी एकत्र जमण्याचे आवाहन करणे हा बेजबाबदारपणा आहे. आपल्याकडील संसर्गाची आकडेवारी अत्यंत गंभीर आहे. आपले आरोग्य सुरक्षित ठेवूयात यासाठी मी जनतेची याचना करतो. साथ संपल्यानंतर तुम्ही हवी तेवढी निदर्शने करू शकता.
- अलेक्झांडर वुचिच, सर्बियाचे अध्यक्ष

संबंधित बातम्या