भारत आणि डेन्मार्क यांच्यामध्ये ऊर्जा क्षेत्र विकासासाठी सहकार्य करण्यासंबंधी करार

Pib
मंगळवार, 9 जून 2020

या नवीन झालेल्या सामंजस्य करारानुसार चिन्हीत केलेल्या क्षेत्रामध्ये परस्परांच्या हितासाठी ऊर्जाविषयक धोरणात्मक आणि तांत्रिक सहकार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी आवश्यक उपाय योजण्यासाठी दोन्ही सरकारच्यावतीने  प्रयत्न करण्यात येणार आहेत.

नवी दिल्ली, 

भारत आणि डेन्मार्क यांच्यामध्ये ऊर्जा क्षेत्र विकासासाठी सहकार्य करण्यासंबंधी करार करण्यात आला. भारत सरकारचे ऊर्जा मंत्रालय आणि डेन्मार्क सरकारचे ऊर्जा, उपयोगिता व हवामान मंत्रालय यांच्यादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार उभय देश आपआपल्या देशांमध्ये ऊर्जा क्षेत्र विकासकार्य करण्यासाठी परस्परांमध्ये दीर्घकाळ सहकार्य करणार आहेत. एकमेकांच्या फायद्यासाठी तसेच उभय देशातली समानता लक्षात घेऊन परस्परांमध्ये व्यवहार करण्यात येणार आहेत. ‘इंडो- डेन्मार्क’ या करारावर दि. 5 जून, 2020 रोजी स्वाक्षरी करण्यात आल्या.

या सामंजस्य करारावर भारताच्या वतीने ऊर्जा विभागाचे सचिव संजीव नंदन सहाय यांनी तर डेन्मार्कच्या वतीने डेन्मार्कचे भारतामधले राजदूत फ्रेडी स्वाने यांनी या करारावर स्वाक्षरी केली.

या करारानुसार दोन्ही देशांमध्ये 'ऑफशोर' पवन ऊर्जा, दीघकालीन ऊर्जा नियोजन, पूर्वानुमान, ग्रीडमध्ये लवचिकता आणणे, तसेच कार्यक्षमतेमध्ये बदल घडवून आणू शकणा-या वीजनिर्मितीच्या पर्यायांचा विचार करून त्यांचे एकत्रीकरण करणे, वीज प्रकल्पांची कार्यक्षमता वाढवून त्यांच्यामध्ये लवचिकता आणणे, यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे. या सामंजस्य कराराचा नवीकरणीय ऊर्जा उत्पादनासाठी भारत आणि डेन्मार्क यांना फायदा होऊ शकणार आहे.

या करारानुसार ज्या ज्या क्षेत्रामध्ये उभय देश एकमेकांना सहकार्य करणार आहेत, त्याच्या अंमलबजावणीसाठी संयुक्त कार्य दलाची स्थापना करण्यात येणार आहे. या गटामध्ये सहसचिव स्तराचे अधिकारी सह-अध्यक्ष म्हणून काम करणार आहेत. दोन्ही देशांच्या सचिव स्तरावरील अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त संचालक समितीला कामाचा अहवाल देतील.

 

संबंधित बातम्या