भारतीय उपखंडात शांततेसाठी सर्वोपतरी प्रयत्न: डोनाल्ड ट्रम्प

PTI
शनिवार, 18 जुलै 2020

व्हाइट हाउसच्या साऊथ लॉनमध्ये आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष ट्रम्प सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी भारत आणि चीन यांच्यात शांतता राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

वॉशिंग्टन

भारत आणि चीन यांच्यातील तणाव कमी व्हावा आणि संबंध सुरळीत राहावेत, अशी अपेक्षा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली. व्हाइट हाउसच्या माध्यम प्रमुख कायली मॅकनेनी यांनी ट्रम्प यांची भूमिका एका प्रश्‍नाचे उत्तर देताना मांडली. आपण भारत आणि चीनच्या नागरिकांवर प्रेम करतो. दोन्ही देशातील नागरिकांत शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी आपण सर्वोपतरी प्रयत्न करु, असे ट्रम्प यांनी म्हटल्याचे मॅकनेनी म्हणाल्या.
व्हाइट हाउसच्या साऊथ लॉनमध्ये आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष ट्रम्प सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी भारत आणि चीन यांच्यात शांतता राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यापूवीही ट्रम्प यांनी भारत आणि चीन यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु दोन्ही देशांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. काही दिवसांपूर्वी व्हाइट हाउसचे अर्थ सल्लागार लॅरी कुडलोव्ह यांनी भारत हा चांगला मित्र असल्याचे म्हटले होते. अध्यक्ष ट्रम्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घनिष्ट मित्र असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
भारत-अमेरिका चांगले मित्र: पॅम्पिओ
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॅम्पिओ यांनी दोन दिवसांपूर्वी भारत-अमेरिका संबंधाबाबत म्हटले की, दोन्ही देश चांगले मित्र आहेत. भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांसमवेत आपले चांगले संबंध आहेत. आम्ही अनेक मुद्द्यावर सतत चर्चा करत आलो आहोत. अलिकडेच चीनसमवेत सुरू असलेल्या सीमावादावरूनही चर्चा झाली आहे. चीनच्या कुरापतीमुळे भारताने चीनच्या ५९ ॲपवर बंदी घातली आहे. हा एक चांगला निर्णय होता. सध्याच्या काळात चीनपासून होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून जग सावध आहे. भविष्यात जगातील लोकशाही देश या आव्हानाला शक्तीनिशी उत्तर देतील.
भारत-चीनचा मोठा स्पर्धक
दुसरीकडे ट्रम्पचे आर्थिक सल्लागार लॅरी कुडलोव्ह यांनी म्हटले की, सध्याच्या काळात भारत हा चीनचा मोठा स्पर्धक होत आहे. त्याचा मुकाबला करत आहे. कोरोना संसर्ग आणि आता सीमावाद यामुळे चीनवरील विश्‍वासर्हतेत घट झाली आहे. भारताने कॉर्पोरेट टॅक्स कमी केला आहे. भारत हा अमेरिकेचा चांगला सहकारी देश आहे. अशा स्थितीत भारत हा अमेरिकी कंपन्यांसाठी गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय आहे. महामारी पसरल्यानंतर अमेरिकेच्या अनेक कंपन्या चीनबाहेर पडू इच्छित आहेत. अशा स्थितीत भारत हे चांगले ठिकाण राहू शकते.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या