जागतिक शांततेला अमेरिकेचाच धोका

पीटीआय
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

चीनचे टीकास्त्र; जगभरातील युद्धांना अमेरिका कारणीभूत असल्याचा आरोप

बीजिंग: भारत आणि अमेरिकेसह अनेक देशांबरोबर विविध कारणांमुळे भांडण उकरून काढलेल्या चीनने आज अमेरिकेवर टीकास्त्र सोडले आहे. जागतिक शांततेला अमेरिकेपासून सर्वांत मोठा धोका असल्याची टीका चीनच्या संरक्षण मंत्रालयाने केली आहे. अमेरिकी सैन्याच्या भावी योजनांबाबतचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर चीनने अमेरिकेवर आरोप केले आहेत. 

चीनच्या लष्करी घडामोडींबाबत आणि त्यांच्या उद्दिष्टांची माहिती देणारा अहवाल अमेरिकेच्या संसदेत काही दिवसांपूर्वी त्यांच्या संरक्षण विभागाने सादर केला होता. चीनच्या कारवायांमुळे अमेरिकेच्या हिताला मोठी बाधा पोहोचत असून जगातील अनेक देशांना धोका निर्माण झाला आहे, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. या अहवालावर चीनच्या संरक्षण मंत्रालयाने आज टीका केली. हा अहवाल म्हणजे चीनच्या उद्दिष्टांबाबत केलेली दिशाभूल असून चिनी सैन्याबाबतही चुकीची माहिती देण्यात आली आहे, असे संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल वु किआन यांनी एका निवेदनाद्वारे सांगितले. ‘अमेरिकेनेच आतापर्यंत जगभरात सर्वत्र अशांतता पसरविली असल्याचा इतिहास आहे. त्यांनी अनेकदा आंतरराष्ट्रीय नियम पायदळी तुडविले आहेत. अमेरिकेने इराक, सीरिया, लीबिया आणि इतर अनेक देशांमध्ये केलेल्या लष्करी कारवायांमुळे आठ लाखांहून अधिक जणांचा बळी गेला आहे तर, कोट्यवधी लोक स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे या देशाने आत्मपरीक्षण करण्याऐवजी चीनच्या सैन्याबाबत चुकीची माहिती देण्यावर समाधान मानले आहे,’ असे किआन यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. अमेरिकेने चीनच्या लष्करी धोरणांकडे तटस्थ बुद्धीने पहावे आणि अफवा पसरविणे थांबवावे, असे आवाहनही किआन यांनी यावेळी केले.
अमेरिका आणि चीनमध्ये सध्या व्यापार, माध्यमे, हिंद-प्रशांत सागरी प्रदेशातील गस्त, कोरोना संसर्ग, विद्यार्थ्यांचा व्हीसा आणि इतर काही मुद्द्यांवरून वाद सुरू आहे. 

अमेरिकेच्या अहवालात

 •     चिनी लष्कराच्या तांत्रिक सामर्थ्याची माहिती आणि त्यांची धोरणे
 •     चीनच्या विस्तारवादी धोरणांची माहिती
 •     चीन सरकारच्या आक्रमक परराष्ट्र धोरणांचा आढावा
 •     त्यांचा जगावर होणारा व होऊ शकणारा परिणाम
 •     तैवान, हाँगकाँगबाबतच्या धोरणांची माहिती 

चीनची वाढती ताकद

 •     चीनचे पायदळ वीस लाखांहून अधिक असून, हे सर्वांत मोठे खडे सैन्य आहे. 
 •     अमेरिकेला मागे टाकत चीनचे नौदल जगात सर्वांत मोठे  
 •     चीनकडे ३५० युद्ध जहाजे आणि पाणबुड्या. 

चीनची टीका

 •     जगभरातील अनेक युद्धांना अमेरिकाच कारणीभूत
 •     अमेरिकेचे धोरण कायमच पक्षपाती
 •     अमेरिकेला युद्धात अधिक रस

संबंधित बातम्या