डोनाल्ड ट्रम्प यांना अजूनही विजयाची आस.. मतं शोधून निकाल बदलण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

PTI
मंगळवार, 5 जानेवारी 2021

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीतील पराभवानंतर अनेक कोर्टकचेऱ्या करूनही विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पदरी निराशाच पडली. त्यानंतर त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

वॉशिंग्टन  :  अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीतील पराभवानंतर अनेक कोर्टकचेऱ्या करूनही विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पदरी निराशाच पडली. त्यानंतर त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शनिवारी (ता. २) जॉर्जियाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दूरध्वनी करत, ‘माझ्यासाठी पुरेशी मते शोधा आणि निकाल बदला,’ अशी विनंतीवजा सूचना केल्याचे उघड झाले आहे. या राज्यात नियोजित अध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांचा विजय झाला आहे. 

‘वॉशिंग्टन पोस्ट’ने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प हे ब्रॅड रॅफेनस्पर्गर यांच्याशी तब्बल एक तास दूरध्वनीवरून बोलत होते. हे संभाषण गुप्तपणे रेकॉर्ड केले गेले. ‘माझ्या पराभवाचे विजयात रुपांतर करण्यासाठी पुरेशी मते शोधा,’ असे ट्रम्प यांनी त्यांना यावेळी सांगितले. ट्रम्प यांची ही कृती म्हणजे अधिकारांचा गैरवापर असून त्यांच्याविरोधात गुन्हाही नोंदवला जाऊ शकतो, असे जाणकारांनी सांगितले. १६ इलेक्टोरल मते असलेल्या जॉर्जियामध्ये ट्रम्प यांचा ११, ७७९ मतांनी पराभव झाला आहे.  ब्रॅड रॅफेनस्पर्गर यांच्याशी बोलताना ट्रम्प म्हणाले की,‘‘ जॉर्जियाचे लोक चिडलेले आहेत, देशातील लोकही चिडलेले आहेत. माझी फक्त इतकीच इच्छा आहे की तुम्ही ११,७८० मते शोधा. या राज्यातील निकाल बदलला तर तो देशासाठी मोठा पुरावा ठरेल. यामुळे ते लोक आपली चूक मान्य करतील. अनेक लोकांच्या मते त्यांनी चूक नाही, तर गुन्हाच केला आहे.  जॉर्जियामध्ये तर ही मोठीच समस्या आहे.’’

‘तुमची माहिती चुकीचीच’

डोनाल्ड ट्रम्प दूरध्वनीवरून बोलत असताना निवडणूक अधिकारी रॅफेनस्पर्गर आणि त्यांचे सहकारी वारंवार त्यांचे आरोप फेटाळून लावत होते. बायडेन यांचा विजय वैध मार्गानेच झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. एकावेळी तर रॅफेनस्पर्गर यांनी तर ट्रम्प यांना, ‘अध्यक्षसाहेब, तुमच्यासमोरील सर्वांत मोठे आव्हान म्हणजे तुमच्या जवळ असलेली माहिती पूर्णपणे चुकीची आहे,’ असेही सुनावले. ट्रम्प यांनी मात्र ‘मी जॉर्जियात हरलेलोच नाही’ असा धोशा कायम ठेवला होता. 

"ट्रम्प यांना नैराश्‍याने ग्रासले आहे. याहून अधिक म्हणजे हे संभाषण म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षांना असलेल्या अधिकारांचा उघड उघड गैरवापर आहे." 
- कमला हॅरिस, अमेरिकेच्या नियोजित उपाध्यक्षा

संबंधित बातम्या