चीनविरुद्ध अमेरिकेचे विधेयक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 जुलै 2020

संसद सदस्यांच्या गटामुळे हालचालींना वेग

वॉशिंग्टन

चीनची नाकेबंदी करण्यासाठी अमेरिकेत राजकीय पातळीवर होत असलेल्या घडामोडींना गुरुवारी आणखी वेग आला. कोरोनाचा गैरफायदा घेण्यासाठी चीन करीत असलेल्या प्रयत्नांबाबत सरकारने विविध बाजूंनी चौकशी करावी असे विधेयक 14 संसद सदस्यांच्या एका गटाने सादर केले आहे.
जॅरेड गोल्डन याचे सूचक असून 13 जणांनी त्यास अनुमोदन दिले आहे. चीनचे प्रयत्न ओळखावेत, त्याची छाननी करावी आणि त्याविरुद्ध लढा द्यावा अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. कोरोनाच्या जोरावर शोषण करण्यापासून चीनला रोखणे असेच या विधेयकाचे नाव आहे. त्याद्वारे राष्ट्रीय गुप्तचर संचालकांना चीन सरकार अवलंबत असलेल्या मार्गांची चौकशी करण्याचा आदेश दिला जाईल.

सर्वंकष विधेयक
- राष्ट्रीय गुप्तचर संचालकांवर मोठी जबाबदारी
- अहवाल सादर करण्यासाठी 90 दिवसांची मुदत
- चीनच्या कारवाया रोखण्यासाठी धोरणकर्त्यांना आवश्यक असलेली माहिती पुरविणे
- आवश्यकता निर्माण होईल तेव्हा संसदेला माहिती देणे
- संरक्षण, परराष्ट्र आणि अंतर्गत सुरक्षा या खात्याच्या सचिवांच्या साथीत समन्वय राखणे
- चीनने गैरफायदा उठविलेल्या किंवा तशी शक्यता असलेव्या विविध मार्गांचा छडा लावणे
- अमेरिका, मित्र राष्ट्र आणि कायद्यावर आधारीत आंतरराष्ट्रीय व्यवस्था असलेल्या यंत्रणेच्या विरोधात सक्रिय असलेल्या चीनला रोखणे
कोरोनाच्या साथीत चीनला जबाबदार धरलेल्या आणि सखोल चौकशीची मागणी करणाऱ्या देशांच्या प्रयत्नांत अडथळे आणण्याचे किंवा त्यास प्रत्यूत्तर देण्याचे चीनचे तंत्र शोधणे
- कोरोना चाचणी, उपचार आणि लस याबाबतची माहिती आणि बौद्धिक संपदेची चोरी करण्याच्या उद्देशाने चीन करीत असलेल्या कारवायांची चौकशी करणे
- हाँगकाँग, तैवान, शीनजियांग अशा प्रांतांमध्ये चीन राबवीत असलेल्या आक्रमक व अन्यायकारक धोरणाचीही छाननी करणे

अमेरिकी लोकांचा जीव वाचविण्यासाठी, अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आपण संघर्ष करीत असताना कोणत्याही देशाने साथीचा गैरफायदा उठविता कामा नये, पण चीन नेमके हेच करीत असल्याचे सुचित्त करणारे अहवाल मिळाले आहेत.
- टोरेस स्मॉल, विधेयकाचे अनुमोदक

कोरोनाची साथ पसरल्यापासून अमेरिकेच्या विरोधात सायबरचोरी आणि अपप्रचार अशा कारवायांत चीन गुंतल्याचा पुरावा मिळाला आहे. आपल्याला हे धोके पूर्णपणे जाणून प्रत्यूत्तर देण्याची गरज आहे. अमेरिकी जनता आणि उद्योगधंद्यांचे रक्षण करण्यासाठी देशाने गुप्तचरांच्या माहितीची छाननी करायला हवी.
- जॅरेड गोल्डन, विधेयकाचे सूचक

संपादन - अवित बगळे

 

संबंधित बातम्या