अमेरिकेतील निवडणूकीपूर्वी ट्रम्प-किम शिखर बैठक व्हावी

Dainik Gomantak
गुरुवार, 2 जुलै 2020

दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांचे आवाहन

सोल

अमेरिकेत तीन नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणूकीपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्यातील शिखर बैठक व्हायला हवी असे आवाहन दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाइ-इन यांनी केले आहे.
बुधवारी एका सरकारी अधिकाऱ्याने पत्रकारांना ही माहिती दिली. मून यांनी मंगळवारी युरोपीय मंडळाचे अध्यक्ष चार्ल्स मिचेल यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.
ट्रम्प व किम यांच्यात सर्वप्रथम 2018 मध्ये सिंगापूरमध्ये बैठक झाली. त्यावेळी उत्तर कोरिया अण्वस्त्र उपक्रम मागे घेण्यासाठी करार होईल अशी दक्षिण कोरियाची आशा पल्लवित झाली होती, पण गेल्या वर्षी व्हिएतनाममधील दुसरी शिखर बैठक अपयशी ठरली. काही आर्थिक निर्बंध उठविण्याच्या बदल्यात मुख्य आण्विक केंद्र नष्ट करण्याचा किम यांचा प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळून लावला.
मून यांनी सांगितले की, ही ठप्प झालेली चर्चा पुन्हा सुरु होम्यासाठी आणखी एक शिखर बैठक होण्याची गरज आहे असे मला वाटते. आण्विक उपक्रम आणि निर्बंध याबाबतची चर्चा आणि तोडगा अखेरीस उत्तर कोरिया-अमेरिका यांच्यातील चर्चेतूनच निघायला हवा. ही भूमिका दक्षिण कोरियाने अमेरिकेला कळविली असून तेथील अधिकारी त्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
एका दिवसापूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र उपमंत्री स्टीफन बिगन यांनी उभय देशांना चर्चेत पुन्हा सहभागी होऊन लक्षणीय प्रगती करण्यासाठी अजूनही पुरेसा वेळ असल्याचे वक्तव्य केले होते. कार्यकारी पातळीवरील वाटाघाटी त्यांच्या नेतृत्वाखाली झाल्या होत्या. नोव्हेंबरपूर्वी प्रत्यक्ष व्यक्तींचा सहभाग असलेली शिखर बैठक होणे अवघड असल्याचे सांगताना त्यांनी कोरोनाचे कारण दिले होते. कोरोनामुळे जगातील राजनैतिक बैठकांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक कार्यक्रम रद्द होत आहेत, असे त्यांनी सांगितले होते.

संबंधित बातम्या