अमेरिकेची चाचणी यंत्रणा सर्वांत मोठी : ट्रम्प

PTI
बुधवार, 15 जुलै 2020

अमेरिकेत ३३ लाखांहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून एक लाख ३५ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

वॉशिंग्टन

अमेरिकेतील कोरोना चाचणी यंत्रणा जगातील सर्वांत मोठी असून भारत, चीन अरबी ब्राझील सारख्या देशांपेक्षा ती कितीतरी अधिक चांगली आहे, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तसेच, अमेरिकेतील कोरोना रुग्णांचा मृत्युदर जगात सर्वांत कमी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
अमेरिकेत ३३ लाखांहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून एक लाख ३५ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. फ्लोरिडा, टेक्सास आणि कॅलिफोर्निया ही राज्ये संसर्ग रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. येथील मृतांची संख्या पुन्हा वाढत असल्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. तरीही ट्रम्प यांनी वरील दावा केला आहे. 'आमच्या सरकारने लोकांपर्यंत पोहोचून मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या केल्याने रुग्णांची संख्या अधिक आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर इतर कोणत्याही देशाने चाचण्या घेतलेल्या नाहीत. इतर काही देशांमध्ये कोणी डॉक्टरांकडे गेल्यावरच त्याची चाचणी होते, त्यामुळे तेथील रुग्णसंख्या कमीच दिसते. अमेरिकेची यंत्रणा इतर कोणापेक्षाही चांगली आणि मोठी आहे. भारत, चीन, रशिया आणि ब्राझील अशा मोठ्या देशांमध्ये रुग्णसंख्येचे आकडे आश्चर्यकारकरित्या कमी आहेत, पण त्यांची चाचणी यंत्रणा अमेरिकेइतकी चांगली नाही,' असे ट्रम्प यांनी एका बैठकीवेळी सांगितले.

चीनने हा चिनी विषाणू किंवा चिनी प्लेग जगात सगळीकडे पसरविला आहे. याबद्दल त्यांना माफ करता येणार नाही.
- डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अध्यक्ष

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या