कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी प्रस्ताव मंजूर

पीटीआय
रविवार, 13 सप्टेंबर 2020

कोरोनाव्हायरसविरोधात एकत्रित लढ्यासाठी भारतासह १६८ देशांनी संयुक्त राष्‍ट्रांच्या (यूएन)आमसभेत व्यापक प्रस्तावाला शुक्रवारी मंजुरी दिली. १९३ सदस्य देशांच्या आम सभेत हा प्रस्ताव १६९ सदस्यांच्या सहमतीने मंजूर करण्यात आला. 

न्यूयॉर्क: कोरोनाव्हायरसविरोधात एकत्रित लढ्यासाठी भारतासह १६८ देशांनी संयुक्त राष्‍ट्रांच्या (यूएन)आमसभेत व्यापक प्रस्तावाला शुक्रवारी मंजुरी दिली. १९३ सदस्य देशांच्या आम सभेत हा प्रस्ताव १६९ सदस्यांच्या सहमतीने मंजूर करण्यात आला. 

‘यूएन’च्या इतिहासात कोरोनाचा साथ ही सर्वांत मोठ्या जागतिक आव्हानांपैकी एक असल्याचे शिक्कामोर्तब या प्रस्तावाद्वारे करण्यात आले. अमेरिका व इस्त्राईलने या प्रस्तावाविरोधात मतदान केले, तर युक्रेन व हंगेरी हे देश तटस्थ राहिले. ‘यूएन’च्या उच्चायुक्तालयातील भारताचे उपस्थायी प्रतिनिधी के. नागराज नायडू यांनी ट्विट करून कोरोनाव्हायरसविरोधात आम सभेत मांडलेल्या प्रस्तावाच्या बाजूने भारताने मतदान केल्‍याची माहिती दिली. कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी आणि कोरोनापश्‍चात परिस्थितीला पूर्ण ताकदीनिशी सामोरे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य, बहुपक्षीय व एकता या सर्व पातळीवर लढण्याची बांधीलकी या प्रस्तावानुसार अधोरेखित केली आहे. 

हा प्रस्ताव कायद्याच्या रूपात बंधनकारक नसला तरी ‘यूएन’ने कोरोनासंदर्भात या वर्षात मंजूर केलेला हा तिसरा व सर्वांत मोठा प्रस्ताव आहे. अफगाणिस्तानचे ‘यूएन’मधील अंदेला राझ आणि क्रोएशियाचे राजदूत इव्हान सिमोनोव्हिक हे या प्रस्तावाचे सह-समन्वयक आहेत.

संबंधित बातम्या