अरबांच्या ‘आशे’ची मंगळाकडे भरारी

PTI
मंगळवार, 21 जुलै 2020

यूएईच्या ‘अल-अमल’ उपग्रहाचे जपानमधून यशस्वी प्रक्षेपण

दुबई

संयुक्त अरब अमिरातीच्या ‘अल-अमल’ (आशा) या उपग्रहाचे आज जपानमधील प्रक्षेपण केंद्रावरून मंगळाच्या दिशेने यशस्वी उड्डाण करण्यात आले. दुसऱ्या ग्रहावरील अरब जगातील ही पहिलीच मोहिम आहे.
जपानमधील तानेगाशिमा अवकाश केंद्रावरून एच-२ए या रॉकेटच्या साह्याने ‘अल-अमल’चे प्रक्षेपण करण्यात आले. उड्डाणानंतर काही वेळाने उपग्रह रॉकेटपासून विलग झाला आणि त्याने तसा सिग्नलही नियंत्रण कक्षाकडे पाठविला. रॉकेटपासून विलग झाल्यावर एक तासाने उपग्रहाला जोडलेले सौर पॅनेल उघडले गेले. दुबईतील अल खवानीज येथे मोहिमेचा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा उपग्रह पुढील सात महिन्यांत ४९ कोटी ३५ लाख किलोमीटर अंतर कापून मंगळाच्या कक्षेत पोहोचणार आहे.
संयुक्त अरब अमिरातीच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेत कोरोना संसर्गाचा सर्वांत मोठा अडथळा आला. शिवाय नंतर जपानमधील खराब वातावरणामुळेही उड्डाण पुढे ढकलावे लागले होते. मात्र, तरीही ‘युएई’च्या शास्त्रज्ञांच्या पथकाने सर्व शक्यतांचा अभ्यास करून जोरदार पूर्व तयारी करत उपग्रहासह प्रक्षेपणासाठीचे सर्व साहित्य आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे बंद होण्याच्या आतच जपानमध्ये आणून ठेवले होते, असे ‘यूएई’चे मंत्री ओमर सुल्तान अल ओलामा यांनी सांगितले.

मोहिमेची वैशिष्ट्ये
- २० कोटी डॉलर : एकूण खर्च
- ६ वर्षे : उपग्रह तयार करण्यासाठी लागलेला कालावधी
- ६८७ दिवस : उपग्रह मंगळाच्या कक्षेत फिरणार

वर्षभर फिरणार
आतापर्यंतच्या बहुतेक मंगळ मोहिमांमध्ये उपग्रह हा दिवसाच्या ठराविक वेळीच कक्षेत फिरतो. त्यामुळे दिवसात एकदाच वातावरणाची नोंद घेतली जाते. ‘अल-अमल’ उपग्रह मात्र मंगळावरील पूर्ण एक वर्षभर, म्हणजे पृथ्वीवरील जवळपास दोन वर्षे, मंगळाभोवती फिरणार आहे.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या