सुधारणावादी ॲबे

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

शिंजो ॲबे यांनी सत्तेपासून दूर असताना वादग्रस्त आणि अस्मितेच्या मुद्यांवर जोर देत लोकप्रियता मिळवली. अखेर, १६ डिसेंबर २०१२ ला ‘एलडीपी’ला सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत मिळाले आणि ॲबे पुन्हा पंतप्रधान झाले.

शिंजो ॲबे हे जपानमधील प्रभावी राजकीय घराण्यातील. त्यांचे आजोबा किशी नोबुसुके (१९५७-६०) आणि चुलत आजोबा सातो इसाकु (१९६४-१९७२) जपानचे पंतप्रधान होते. टोकियोतील सैकेई विद्यापीठातून पदवीधर झाल्यावर अॅबे यांनी अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात राज्यशास्त्राचा अभ्यास केला. नंतर जपानला परतल्यावर लिबरल डेमोक्रॅटिक पक्षात (एलडीपी) सामील झाले. १९८२ पासून ते वडील आणि जपानचे परराष्ट्रमंत्री शिंतारो ॲबे यांचे सहायक झाले. शिंजो ॲबे १९९३ मध्ये जपानी संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे सदस्य झाले. पक्षाचे नेते कोझुमी जुनीशिरो यांना २००६ मध्ये पक्षनेतेपद आणि पंतप्रधानकी सोडावी लागली आणि ॲबे त्यांच्या जागी विराजमान झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर जन्मलेले ॲबे जपानचे पहिले पंतप्रधान. सत्तेवर येताच त्यांनी अमेरिकेशी सलगी आणि उत्तर कोरियाशी वैर केले आणि संरक्षण आणि आर्थिक बाबींत सुधारणांना हात घातला, पण निवृत्तीवेतन यादीतील घोळाने लाखो नागरिक त्रस्त झाले. अखेर जुलै २००७ मध्ये ‘एलडीपी’ने वरिष्ठ सभागृहात सत्ता गमावली. 

ॲबेनॉमिक्‍स
ॲबे यांनी सत्तेपासून दूर असताना वादग्रस्त आणि अस्मितेच्या मुद्यांवर जोर देत लोकप्रियता मिळवली. अखेर, १६ डिसेंबर २०१२ ला ‘एलडीपी’ला सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत मिळाले आणि ॲबे पुन्हा पंतप्रधान झाले. २०११ मध्ये भूकंप, सुनामीने हादरलेल्या जपानला सावरण्यासाठी ॲबे यांनी आर्थिक उपाययोजना केल्या. यालाच पुढे ॲबेनॉमिक्‍स म्हटले जाऊ लागले. ॲबे यांची आर्थिक जादू सुरवातीला चांगली चालली. बेरोजगारी घटली, वस्तूवापरात आणि करात वाढ झाली, पण एप्रिल २०१४ पासून आर्थिक घसरण होत, मंदी आली. ॲबे यांनी घटनादुरूस्ती केली, त्याने लष्कराला कोणी आक्रमण केल्यास बळाच्या वापराचा मार्ग खुला झाला. २०२० च्या ऑलिंपिकचे यजमानपद जपानला मिळाले, पण त्यासाठी स्टेडियम उभारणी, त्यावरील खर्च यावर टिका झाली. त्यांना कोलायटिसचा त्रास आहे. याच कारणास्तव त्यांनी २००७ मध्ये पंतप्रधानकी सोडली होती, यावेळी मात्र आजार बळावल्याने राजीनामा दिला आहे. 

भारताशी मैत्रीला प्रोत्साहन
शिंजो ॲबे यांनी भारताशी संबंध सुधारण्यावर भर दिला. मुंबई-अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेनसाठी सहकार्य, ईशान्य भारतातील अनेक प्रकल्पांना अर्थसहाय्य, चीनच्या बेल्ट रोड उपक्रमाला शह देण्यासाठी म्यानमारमार्गे भारताला आग्नेय आशियाला जोडण्याचा पर्यायही दिला. 

ॲबे यांच्यानंतर कोण?
ज्येष्ठ असलेले अर्थमंत्री तारो असो, साठीचे माजी संरक्षणमंत्री शिगेरू इशिबा, परराष्ट्रमंत्री राहिलेले फुमिओ किशीदा, विद्यमान संरक्षण मंत्री तारो कोनो, अबेंचे विश्वासू योशिहिदा सुगा यांची नावे पंतप्रधानपदासाठी चर्चेत आहेत. 

(सकाळ संशोधन आणि विकास विभाग)

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या