लक्षणरहित कोरोना रुग्ण 40 टक्के

Avit Bagle
मंगळवार, 14 जुलै 2020

अमेरिकी केंद्रानुसार संसर्गाची शक्यता 75 टक्के

वॉशिंग्टन

कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण 40 टक्के आहे आणि त्यांच्यापासून संसर्ग होण्याची शक्यता तब्बल 75 टक्के असल्याचे अमेरिकेत आढळून आले आहे. लक्षणरहित रुग्णांचे प्रमाण पाच टक्यांनी वाढले असताना संसर्गाचे प्रमाण 25 टक्यांनी कमी झाले.
रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (सीडीसी) अद्ययावत माहिती दिली आहे. त्यासाठी गेल्या महिन्यातील आकडेवारीचा आधार घेण्यात आला. तसे वृत्त सीएनएन या वृत्तसंस्थेनेही दिले आहे. मे महिन्याच्या अखेरीस लक्षणरहित रुग्णांची टक्केवारी 35, तर संसर्गाची शक्यता शंभर टक्के होती.

नव्या माहितीचे मुद्दे
- संसर्ग आणि मृत्यू यांच्यातील गुणोत्तर प्रमाणाचा नवा अहवाल
- संसर्गाच्या तीव्रतेचा आणखी अचूक अंदाज घेण्याचा उद्देश
- लक्षण असलेल्या आणि ती नसलेल्या रुग्णांच्या मृत्यूची मोजमाप
- नव्या गणनेनुसार बाधित रुग्णांच्या मृत्यूची शक्यता 0.65 टक्के
- दक्षिण आणि पश्चिम अमेरिकेतील अनेक प्रांतांमध्ये बाधित तसेच रुग्णालयात दाखल रुग्णांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ
- सीडीसीप्रमाणेच जागतिक आरोग्य संघटनेकडूनही (डब्लूएचओ) अद्ययावत माहिती
- हवेत अनेक फुटांपर्यंत तरंगणाऱ्या तुषारांमुळे संसर्ग शक्य असा डब्लूएचओचा आधीचा अहवाल
- अनेक शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची खुल्या पत्राद्वारे यात बदल करण्याची मागणी

शाळा उघडण्याचा मुद्दा
ट्रम्प प्रशासनाने शाळा उघडण्यासाठी शैक्षणिक संस्थांवर दडपण आणले आहे, पण देशभरातील शालेय व्यवस्थापन आणि बालरोगतज्ञांनी रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली आहे. लक्षणररित रुग्ण हे याचे मुख्य कारण आहे. कोरोनामुळे मुले गंभीर आजारी पडण्याची आणि त्याचा मृत्यू होण्याची शक्यता कमी आहे, पण लक्षणरहित रुग्ण म्हणून ते संसर्गाचे माध्यम ठरू शकतात आणि आरोग्याच्या संदर्भात असुरक्षित परिसरात धोकादायक ठरू शकतात असे वृत्त बीझनेस इनसायडरच्या कॉन्नर पेरेट यांनी आधी दिले होते.

गेल्या काही दिवसांत रुग्ण विक्रमी संख्येने वाढले तरी दोन ते तीन आठवड्यांत कोरोना संसर्गाचे चित्र अमेरिकेला पालटता येईल, फक्त त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या पातळीवर योगदान देणे गरजेचे आहे. मास्कचा वापर, एकमेकांत सहा फूट अंतर राखणे, ज्या गोष्टी परिणामकारक ठरल्या आहेत त्यांचे पालन करणे अटळ आहे.
- जेरॉम अॅडम्स, मुख्य शल्यविशारद

संबंधित बातम्या