‘आता पान उलटा’: बायडेन यांंचे देशवासीयांना आवाहन

दैनिक गोमन्तक
बुधवार, 16 डिसेंबर 2020

निवडणुकीत पराभव होऊनही तो मान्य न करणे म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे, अशी टीका बायडेन यांनी ट्रम्प व त्यांच्या सहकाऱ्यांवर केली.

वॉशिंग्टन: अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या नावावर अध्यक्षीय निवड समितीच्या (इलेक्ट्रोल कॉलेज) सदस्यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर ‘आता पान उलटा’, असे आवाहन बायडेन यांनी देशवासीयांना केले. निवडणुकीत पराभव होऊनही तो मान्य न करणे म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे, अशी टीका बायडेन यांनी ट्रम्प व त्यांच्या सहकाऱ्यांवर केली. 

अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आलेले डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन यांच्या खात्यात ‘इलेक्ट्रोल कॉलेज’ने सदस्यांनी सोमवारी (ता. १४) बहुमताचे पारडे टाकले. त्यांना सुमारे ३०६ ‘इलेक्ट्रोल’ मते मिळाली. यानंतर बोलताना बायडेन यांनी वरील आवाहन केले. विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उतावीळपणाबद्दल संताप व्यक्त केला. निवडणुकीत पराभव होऊनही तो मान्य न करणे म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे, अशी टीका बायडेन यांनी ट्रम्प व त्यांच्या सहकाऱ्यांवर केली. ‘‘जर एखाद्याला यापूर्वी माहिती नसेल, तर आम्हाला आता त्याची कल्पना आली आहे. या लोकशाहीत अमेरिकन जनतेच्या हृदयातील ही खोलवरील जखम आहे, अशा भावना बायडेन यांनी डेलवरमधील विल्मिंग्टन येथे बोलताना व्यक्त केली. ‘आता पान उलटण्याची, एकत्र येण्याची आणि यातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे, ’ असे आवाहनही त्यांनी केले. 

अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ट्रम्प यांनी पराभव स्वीकारण्‍यास नकार देत उलट यात फसवणूक, गैरप्रकार झाल्याचा आरोप सातत्याने केला. निवडणूक निकाल बदलण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिकाही त्यांनी न्यायालयात दाखल केली होती. या सर्व काळात बायडेन यांनी संयम बाळगला होता. मात्र काल ‘इलेक्ट्रोल कॉलेज’ची मते जाहीर झाल्यानंतर त्यांनी ट्रम्प यांच्यावर कडाडून हल्ला केला. टीका करताना त्यांनी पूर्वी कधीही घेतले नव्हते एवढ्या वेळा त्यांनी ट्रम्प यांच्या नावाचा उल्लेख केला. रिपब्लिकन पक्षाच्‍या सदस्यांवरही ते बरसले.

मतांची पडताळणी सहा जानेवारीला 
देशातील विविध राज्यांच्या राजधानीच्या शहरांमध्ये ‘इलेक्टर्स’ने प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतीने मतदान केले. या मतदानाला जनतेच्या दृष्टिने फारसे महत्त्व नसले तरी ट्रम्प यांनी पराभव अमान्य केल्याने याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. बायडेन यांनी ३०६ तर ट्रम्प यांना २३२ मते मिळाली आहेत. अमेरिकेतील जॉर्जियात १६, ॲरिझोनात ११ आणि नवाडा येथे सहा ‘इलेक्टर्स’ने बायडेन यांच्या बाजूने मतदान केलेले होते. सर्व निकाल  जाहीर झाल्यानंतर वॉशिंग्टनला पाठविण्यात येतील. उपाध्यक्ष माईक पेन्स यांच्‍या अध्यक्षतेखाली ६ जानेवारी रोजी होणाऱ्या संयुक्त सत्रात मतमोजणीचा आणखी एक सोपस्कार पार पाडून आधीच्या मतांशी पडताळणी होणार आहे. यातून निकालात बदल होण्याचा अखेरची आशा ट्रम्प व त्यांच्या सहकाऱ्यांना आहे. आतापर्यंत जसा त्यांना पराभव झाला तसा तेथेही झाल्यास बायडेन हे २० जानेवारी रोजी अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून अधिकृतरीत्या शपथ घेतील.

आणखी वाचा:

तुरुंगात कोरोनाचा प्रसार वाढलेला असूनही पाकिस्तानी सरकार आत्मसंतुष्ट -

 

 

संबंधित बातम्या