हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपची मुसंडी ; ४८ जागा जिंकत दुसऱ्या स्थानी

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 5 डिसेंबर 2020

अत्यंत चुरशीच्या ठरत असलेल्या बृहन हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली आहे. गेल्या निवडणुकीत केवळ चार नगरसेवक असताना यंदा मात्र ही संख्या ४८ वर गेली आहे. 

हैदराबाद :  अत्यंत चुरशीच्या ठरत असलेल्या बृहन हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली आहे. गेल्या निवडणुकीत केवळ चार नगरसेवक असताना यंदा मात्र ही संख्या ४८ वर गेली आहे. रात्री नऊपर्यंतच्या निकालात एकूण दीडशे प्रभागांपैकी सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समिती ५५,  एमआयएम ४४ आणि कॉंग्रेसला २ जागा मिळाल्या आहेत. कोणत्याच पक्षाने ६० जागांचा पल्ला गाठलेला नसल्याने स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नाही. महापौरपदासाठी ७६ जागांचे बळ गरजेचे असून तेलंगण राष्ट्र समिती आणि एमआयएमशी आघाडी करत महापौरपदावर दावा करु शकतात, असे राजकीय तज्ञांचे मत आहे. 

जीएचएमसी निवडणुकीत भाजपने सत्तारूढ तेलंगण राष्ट्र समिती आणि सहकारी पक्ष मजलिस पक्षाला जोरदार झटका दिला आहे. भाजपने ४८ प्रभागांवर दणदणीत यश मिळवले 
आहे.विशेष म्हणजे २०१६ च्या निवडणुकीत भाजपचे केवळ चार नगसेवक निवडून आले होते. २०१६ मध्ये ९९ नगरसेवक असलेल्या टीआरएसला ५६ जागांवर समाधान मानावे लागत आहे. तर एमआयएमला ४४ जागा मिळाल्या होत्या .

 

कविता यांना धक्का

मुख्यमंत्री के.सी.आर राव यांची कन्या आणि आमदार कविता यांना निवडणुकीसाठी गांधीनगर प्रभागाचे प्रभारी म्हणून टीआरएसने नियुक्ती केली होती. परंतु गांधीनगर प्रभागात टीआरएसच्या उमेदवार मुठा पद्मा यांचा पराभव झाला. त्याठिकाणी भाजपच्या पावनी विजयी झाल्या. 

संबंधित बातम्या