‘ब्रेक्झिट’ने ब्रिटनमध्ये नव्या युगाचा प्रारंभ

PTI
शनिवार, 2 जानेवारी 2021

ब्रिटनमध्ये आज नव्या वर्षाच्या पहाटे नव्या युगाची द्वारे खुली झाली. ब्रिटन युरोपिय समुदायातून (ईयू) आता औपचारिकरीत्या बाहेर पडला आहे.

लंडन :  ब्रिटनमध्ये आज नव्या वर्षाच्या पहाटे नव्या युगाची द्वारे खुली झाली. ब्रिटन युरोपिय समुदायातून (ईयू) आता औपचारिकरीत्या बाहेर पडला आहे. युरोपिय समुदायाच्या बांधिलकीतून ब्रिटन गुरुवारी रात्री ११ वाजता मुक्त झाला. प्रवास, व्यापार आणि सुरक्षेसंबंधी स्वतंत्र नियम लागू झाले. आर्थिक स्तरावरील विभाजनाने ‘ईयू’चे आकुंचन झाले आहे तर ब्रिटन मुक्त झाला आहे. मात्र या अस्थिर जगात तो एकाकी झाल्याचे मानण्यात येत आहे. दुसऱ्या महायुद्धापासून ब्रिटन युरोपिय समुदायाचा भाग होता. ‘ब्रेक्झिट’ करारामुळे ते वेगळे झाले असून ‘देशासाठी हा अद्‍भूत क्षण आहे,’ अशी भावना पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नव्या वर्षांच्या शुभेच्छापर व्हिडिओ संदेशात व्यक्त केली. ‘ब्रेक्झिट’मधून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनला स्वातंत्र्य मिळाले असून अनेक गोष्टी वेगळ्या व चांगल्या प्रकारे करण्याची क्षमताही आपल्याकडे आहे.

ब्रिटनच्या जनतेने २०१६ मध्ये मतदानाने युरोपिय समुदायातून बाहेर पडण्याचा कल व्यक्त केला होता. गेल्या ११ महिन्यांपासून हा करार ‘ईयू’च्या व्यापारसंबंधीच्या नियमांत अडकलेला होता. दोन्ही गट भविष्यातील त्यांच्या आर्थिक समझोत्यावर चर्चा करीत होते. नाताळाच्या आदल्या दिवशी या करारावर सहमती दर्शविण्यात आली. संसदेने बुधवारी (ता.२८) मंजुरी दिल्यानंतर ब्रिटनमध्ये हा कराराचे कायद्यात रूपांतर झाले आणि अखेर साडेतीन वर्षानंतर ३१ जानेवारीला ब्रिटनने अधिकृतरीत्या २७ सदस्य देशांचा समावेश असलेले ‘ईयू’चे राजकीय आर्थिक व्यासपीठ सोडले.

घंटेचा निनाद

कोरोनामुळे ब्रिटनमध्ये लॉकडाउन असल्याने काल रात्री हा क्षण सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यासाठी संधी नागरिकांना मिळाली नाही. पण या आनंदाप्रीत्यर्थ संसदेतील भव्य ‘बिग बेन’ घंटा ११ वेळा वाजविण्यात आली.

"ब्रिटन एक मित्र आणि सहयोगी देशाच्या रूपात युरोपीय समुदायाबरोबर असेल."
- इमॅन्युअल मॅक्रॉन, अध्यक्ष, फ्रान्स

 

असे होणार बदल

  • ब्रिटन आणि ‘ईयू’च्या सदस्य देशांमध्ये स्वतंत्र आवाक-जावक बंद झाली आहे. या ऐवजी ब्रिटनमध्ये श्रेणीनिहाय इमिग्रेशन व्यवस्था.
  •  ब्रिटनमधील व्यक्तीला युरोपीय समुदायातील देशांमध्ये ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस राहण्यासाठी व्हिसाची आवश्‍यकता.
  • विनाशुल्क खरेदी शक्य. ‘ईयू’तून ब्रिटनला परतणाऱ्या व्यक्तीला ४२ लिटर बियर, १८ लिटर मद्य, २०० सिगारेट कोणत्याही कराविना आणता येणार आहे.
  • ब्रिटनमध्ये राहण्याची इच्छा असणाऱ्या आयर्लंड वगळता ‘ईयू’च्या अन्य देशांच्या नागरिकांसाठी श्रेणीनिहाय व्यवस्था लागू होईल. 
  • गुन्हेगारांची माहिती, बोटांचे ठसे व ‘वॉन्टेड’ लोकांची यादी अशी माहिती असणारी ‘ईयू’ची कागदपत्रे ब्रिटन पोलिसांकडे उपलब्ध नसतील.
  •  इंग्लंड,  स्कॉटलंड, वेल्समधील जे व्यापारी ‘ईयू’च्या देशांबरोबर व्यापार करतात, त्यांच्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार. 
  •  ब्रिटनच्या उत्पादनांवर अन्य युरोपिय बाजारपेठांमध्ये कोणतेही आयातशुल्क नसेल. मात्र यासाठी युरोपिय समुदायातील देशांमध्ये जाणाऱ्या लोकांना आणि उद्योगांसाठी कागदपत्रांची जंत्रीच सादर करावी लागेल.

संबंधित बातम्या