भारताबरोबर लडाखमध्ये झालेल्या लष्करी संघर्षानंतर चिनी लष्कराकडून नव्या 'जनरल'ची नियुक्ती

वृत्तसंस्था
सोमवार, 21 डिसेंबर 2020

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून नव्या जनरलची नियुक्ती केली आहे. त्यांचे नाव झँग शुडाँग असे आहे.

बीजिंग :  चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून नव्या जनरलची नियुक्ती केली आहे. त्यांचे नाव झँग शुडाँग असे आहे. भारतीय सीमेवरील लडाखमध्ये लष्करी संघर्षानंतर तणाव निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे. झिन्हुआ या अधिकृत सरकारी वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. जिनपिंग हे केंद्रीय लष्करी आयोगाचे प्रमुख आहेत. सुमारे २० लाख सदस्यसंख्या असलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मीची ही सर्वोच्च संस्था आहे. भारत-चीन सीमेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी पश्चिम विभागाची आहे.

मे महिन्यात पूर्व लडाखमध्ये भारतीय लष्कराबरोबर संघर्ष झडल्यापासून उभय देशांत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. अशा राजनैतिक आणि लष्करी पातळीवर अशा अनेक फेऱ्या पार पडल्या तरी दीर्घ काळचा पेच कायम आहे. अलिकडची फेरी दोनच दिवसांपूर्वी पार पडली. परराष्ट्र मंत्रालय पातळीवरील या फेरीत नियंत्रण रेषेवरील संघर्षाच्या सर्व ठाण्यांवरून सैन्य पूर्ण मागे घेण्यासाठी काम सुरू ठेवण्यावर सहमती दर्शवण्यात आली. लष्करी संवादाची पुढील फेरी लवकर घेण्याचेही त्यात ठरले.
दरम्यान, जिनपिंग यांनी चार वरिष्ठ लष्करी आणि सशस्त्र पोलीस अधिकाऱ्यांना बढती दिली. यात लष्करी आयोगाच्या  पायाभूत सुविधा खात्याचे राजकीय समन्वयक गुओ पुशीयाओ, व्युहात्मक पाठबळ दलाचे राजकीय समन्वयक ली वेई आणि कमांडर वँग चुनींग यांचा समावेश आहे.

डोकलाम अन् गलवान

पश्चिम विभागाचे प्रमुख जनरल झाओ झोंगक्वी हे ६५ वर्षांचे आहेत. २०१७ मध्ये डोकलाम तसेच यंदा गलवान अशा दोन ठिकाणी चिनने भारताबरोबर लष्करी संघर्ष छेडला. अशा दोन्ही चकमकींच्यावेळी झोंगक्वी यांच्याकडे सूत्रे होती. तीन वर्षांपूर्वी पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय सीमेवर रस्ता बांधण्याच्या हालचाली केल्या होत्या. भूतानचा दावा असलेल्या भागातील त्यांच्या कारवायांविरुद्ध भारतीय लष्कर उभे ठाकले होते. अलिकडेच चीनने हजारो सैनिक सीमेवर जमवून लष्करी कवायतींवर जोर दिला, जे धुमश्चक्रीस कारणीभूत ठरले.
 

अपरिचित अधिकारी

बाह्य जगतासाठी जनरल झँग हे अधिकारी म्हणून अपरिचित राहिले आहेत. पश्चिम विभागाबरोबरील त्यांच्या संबंधांबद्दल फारशी माहिती नाही. याआधी बहुतांश काळ ते पीपल्स लिबरेशन आर्मीच्या इतर विभागांमध्येच सक्रीय होते.

संबंधित बातम्या