भारतीय विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांच्या संपर्कात राहावे; चीनचे आवाहन

पीटीआय
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार चीनमधील विद्यापीठे व विविध महाविद्यालयांतून २३ हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी शिकत आहेत. त्यापैकी २१ हजारांपेक्षा अधिक जण एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत.

बीजिंग: चीनमध्ये शिकणाऱ्या तसेच कोरोना साथीमुळे घरी परतलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालय किंवा शैक्षणिक संस्थांच्या संपर्कात राहण्याचे आवाहन चीनने केले आहे. चीनमध्ये अद्याप परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नसल्याने ऑनलाइन कोर्सच्या माध्यमातून शैक्षणिक प्रगती साधावी, असे चीनने म्हटले आहे. 

गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार चीनमधील विद्यापीठे व विविध महाविद्यालयांतून २३ हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी शिकत आहेत. त्यापैकी २१ हजारांपेक्षा अधिक जण एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. त्यातील बहुतेक विद्यार्थी जानेवारीत भारतात परतले होते. त्याच सुमारास चीनमध्ये कोरोनाची साथ पसरण्यास सुरवात झाली. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय प्रवासावरही निर्बंध लादले गेले. सद्यःस्थितीत चीनमध्ये परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही. मात्र, चीन सरकार या विद्यार्थ्यांच्या कायदेशीर अधिकाराचे संरक्षण करण्यास अतिशय महत्त्व देते, असे चीनच्या शिक्षण मंत्रालयाने येथील भारतीय दूतावासाला कळविले आहे. त्यापूर्वी, दूतावासाने भारतीय विद्यार्थी, शिक्षकांबद्दलची काळजी व्यक्त केली होती.

भारतीय दूतावासाकडूनही सूचना
जगभरातील कोरोना विषाणूची परिस्थिती अजूनही असंदिग्ध आहे. चीनमध्ये प्रवेश करण्याच्या व बाहेर पडण्याच्या धोरणात हळूहळू सुधारणा केली जात आहे. चीनमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी संबंधित विद्यापीठ, महाविद्यालयाच्या संपर्कात राहावे. चीनमधील शिक्षणाची फेररचना करण्यासाठी या महाविद्यालयांच्या सूचना पाळाव्यात, असे आवाहन बीजिंगमधील भारतीय दूतावासाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.

२३ हजार: चीनमध्ये शिकणारे एकूण भारतीय विद्यार्थी
२१ हजार: चीनमध्ये एमबीबीएस पदवीचे विद्यार्थी

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या