चीनकडून कराराचा भंग : ब्रिटन

Dainik Gomantak
शुक्रवार, 3 जुलै 2020

१९९७ मध्ये ब्रिटिशांनी त्यांची हाँगकाँगमधील वसाहत सोडून या शहराचा ताबा चीनकडे परत दिला होता. मात्र, असे करताना हाँगकाँगला पुढील पन्नास वर्षे स्वायत्तता असावी, असा करार केला होता.

लंडन

चीनने हाँगकाँगमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करून ब्रिटनबरोबर १९९७ मध्ये केलेल्या कराराचा भंग केला आहे, अशी टीका ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी आज केली आहे. तसेच, हाँगकाँगमधील अनिवासी ब्रिटिश नागरिकांना ब्रिटनचे नागरिकत्व दिले जाईल, असेही त्यांनी घोषित केले.
संसदेत प्रश्‍नोत्तराच्या तासात बोलताना पंतप्रधान जॉन्सन म्हणाले की, चीनचा राष्ट्रीय सुरक्षा कायदा हा हाँगकाँगमधील नागरिकांच्या हक्कांवर आणि स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे. नियम आणि अटींची पूर्तता करणे हाच आंतरराष्ट्रीय संबंधांचा पाया असतो. नव्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी म्हणजे १९९७ मध्ये आमच्याबरोबर चीनने केलेल्या कराराची पायमल्ली आहे. यामुळे हाँगकाँगच्या स्वायत्ततेचा थेट भंग होत आहे. १९९७ मध्ये ब्रिटिशांनी त्यांची हाँगकाँगमधील वसाहत सोडून या शहराचा ताबा चीनकडे परत दिला होता. मात्र, असे करताना हाँगकाँगला पुढील पन्नास वर्षे स्वायत्तता असावी, असा करार केला होता. हाँगकाँगमध्ये जवळपास साडेतीन लाख अनिवासी ब्रिटिश नागरिक असून त्यांना ब्रिटनचे नागरिकत्व देण्यास आमचे सरकार बांधील आहे, असेही जॉन्सन यांनी यावेळी सांगितले.

ऑस्ट्रेलियाकडून मदतीचा हात
चीनच्या दडपशाहीला घाबरून बाहेर पडू इच्छिणाऱ्या नागरिकांना आश्रय देण्याचा विचार असल्याचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी म्हटले आहे. तसेच, ब्रिटनच्या पंतप्रधानांनी हाँगकाँगवासीयांना जशी मदत देऊ केली आहे, तशीच मदत आपणही देऊ शकतो, असेही मॉरिसन म्हणाले आहेत. याबाबत लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या