चीनकडून आता व्हिएतनामची पकड

अवित बगळे
मंगळवार, 28 जुलै 2020

व्यवसाय बंद करण्यासह प्रचंड भरपाईही घेणार

वॉशिंग्टन

दक्षिण चिनी समुद्रावरील मक्तेदारी कायम राखण्याच्या उद्देशाने चीनने व्हिएतनामची पकड करण्याचा डाव खेळला आहे. समुद्रकिनाऱ्यालगतचे व्यवसाय बंद करण्यासह एक अब्ज डॉलर नुकसानभरपाई देणेही व्हिएतनामला भाग पडले आहे.
डिप्लोमॅट या आंतरराष्ट्रीय घडामोडींची नोंद ठेवणाऱ्या संकेतस्थळाने हे वृत्त दिले आहे. चीनच्या दबावामुळे तसेच वाढत्या कारवायांमुळे व्हिएतनामच्या कंपन्यांना या क्षेत्रात तेल आणि वायु स्रोत विकसित करता येत नव्हते. त्यातच पेट्रोव्हिएतनाम या सरकारी ऊर्जा कंपनीला उत्खनन मोहीम रद्द करावी लागली. तसा करार रद्द करण्याबरोबरच स्पेनचे रेप्सोल आणि संयुक्त अरब अमिरातीची मुबादला या दोन कंपन्यांना एक अब्ज डॉलरच्या घरात भरपाई देण्यास सहमती दर्शविणे भाग पडले. रेप्सोलकडे पूर्वी समुद्रकिनाऱ्यावरील 13 विभागांमधील उत्खननाचे हक्क होते, पण दोन वेळा त्यांना नियोजीत उत्खनन रद्द करावे लागले होते.
या संकेतस्थळाचे प्रतिनिधी बिल हेटन यांनी विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. आणखी एका घडामोडीनुसार वुंग ताऊ या आपल्या बंदरात दोन महिने उभा असलेला उत्खनन मनोरा तसेच इतर यांत्रिक सामग्री खाली उतरविणे व्हिएतनामला भाग पडले आहे. नोबल कॉर्पोरेशनकडे याची मालकी होती. त्यांना सुद्धा करार रद्द करण्यापोटी भरपाई द्यावी लागेल. परिणामी व्हिएतनामला आणखी लाखो डॉलरचा फटका बसेल.

राजकीय निर्णय
हेटन यांनी सांगितले की, रेप्सोलला चीनमध्ये फारसा रस नव्हता. व्हिएतनामच्या एका टोकाकडील खास आर्थिक क्षेत्रात तसेच वादग्रस्त नसलेल्या क्षेत्रात त्यांना संधी मिळाली होती, मात्र राजकीय कारणांमुळे करार रद्द करणे भाग पडल्याचे रेप्सोलला कळविण्यात आले. व्हिएतमामच्या सर्वोच्च नेतृत्वाला चीनच्या तीव्र दडपणामुळे तसे करणे भाग पडले.

तांडा सज्ज
चीनने हैनन बेटालगत नौदलाच्या तब्बल 40 नौकांचा तांडा सज्ज ठेवला आहे. उत्खननाच्या ठिकाणापासून केवळ दोन दिवसांच्या अंतरावर चीनने ही सज्जता ठेवली आहे. त्यावरून चीन कोणत्याही क्षणी संघर्षास सज्ज आहे.

अमेरिकेचा दबाव
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पीओ यांनी नुकताच चीनवर दबाव आणला होता. दक्षिण चिनी समुद्रात इतर देशांशी संबंधित कोणताही दावा अमेरिका फेटाळून लावते. या देशांच्या मासेमारी किंवा हायड्रोकार्बन निर्मिती उपक्रमांमध्ये अडथळे आणू नयेत. तशा कारवाया केल्यास त्या बेकायदेशीर असतील, असे त्यांनी स्पष्ट केले होते. व्हिएतनामलगतची वॅनगार्ड किनारपट्टी, मलेशियालगतचे ल्युकोनिया शोलाज, ब्रुनेईच्या सागरी हद्दीतील विशेष आर्थिक क्षेत्र आणि इंडोनेशियालगतचे नातुना बेसर असे विशिष्ट उल्लेख त्यांनी केले होते.

रशियालाही धक्का
रॉसनेफ्ट या रशियन कंपनीलाही किनाऱ्यावरील उत्खनन स्थगित करावे लागले आहे. उत्खनन जेथे होणार होते तेथे चीनच्या सागरी दलाची असंख्य जहाजे सक्रिय आहेत.

संबंधित बातम्या