China: 3 वर्षावरील मुलांचं होणार लसीकरण; 'करोनाव्हॅक' लसीला दिली मंजूरी

China: 3 वर्षावरील मुलांचं होणार लसीकरण; 'करोनाव्हॅक' लसीला दिली मंजूरी
china covid.jpg

संपूर्ण जगाला चीनच्या (china) वुहानमधून (Wuhan) उगम पावलेल्या कोरोनाने (covid19) आपल्या विळख्यात घेतले आहे. यामुळे जगभरात अनेक जणांना आपला जीव गमावाला लागला आहे. त्याचबरोबर जगाचं अर्थचक्रही मंदावलं आहे. पहिल्या कोरोनाच्या लाटेनंतर आता दुसरी लाटेचेही गंभीर परिणाम दिसून आले आहेत. येणाऱ्या काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं भाकीतही वर्तवण्यात येत आहे. या तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका हा लहान मुलांना असल्याचं सांगण्यात येत आहे. यासाठी भारताने लहान बालकांवर 'कोव्हॅक्सिन' (covaxin) लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल देखील सुरु केली आहे. तर दुसरीकडे 3 वर्षावरील मुलांसाठी चीनने 'कोरोनाव्हॅक' (Coronavack) लसीला मंजुरी दिली आहे. (China Children above 3 years to be vaccinated Coronavack vaccine approved)

3 ते 17 वयोगटातील बालकांवरील क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाल्यांनतर ही मंजूरी देण्यात येणार आहे. त्यामुळे आता 3 वर्षावरील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सिनेव्हॅक कंपनीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी यीन वेईतॉंग (Yin Weitong) यांनी ही माहिती दिली आहे. मात्र ही लस कधीपासून देण्यात येणार आहे हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. देशात लसीकरणासाठी चीनने पाच लसींना मंजूरी दिली आहे.   

''चीन सरकारनं कोरोनाव्हॅक लसीला मंजूरी दिली आहे. मात्र कधीपासून ही लस देण्यात येणार हे अद्याप ठरवलेलं नाही. करोनाव्हॅक लसीची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे. क्लिनिकल ट्रायल दरम्यान 3 ते 17 वयोगटातील शेकडो मुलांना ही लस देण्यात आली. त्यातून ही लस सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच प्रभावी असल्याचे देखील दिसून आले आहे,'' असं यीन वेईतॉंग यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

1जून रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization) चीनी बनावटीची कोरोना लस असलेल्या सिनेव्हॅकला मंजूरी दिली आहे. याआगोदर सिनोफार्म लसीला मंजूरी दिली होती. देशातील नागरिकांच्या लसीकरणासोबत इतर देशांना लस पुरवण्याचं उद्दीष्ट चीन सरकारने निश्चित केले आहे.

गेल्या काही दिवसात चीनमध्ये लसीकरण मोहिमेचा वेग आणखी वाढवण्यात आला आहे. मागील पाच दिवसात 10 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच या वर्षाअखेर देशातील 80 टक्के लोकांचे लसीकरण करण्याचं उद्दीष्ट असल्याचं सांगण्यात आलं आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com