चीनकडून अखेर बायडेन यांचे अभिनंदन

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणूकीच्या निकालानंतर जवळपास एक आठवडा प्रतिक्रिया टाळलेल्या चीनने अखेर डेमोक्रॅटीक पक्षाच्या ज्यो बायडेन यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले.

बीजिंग :  अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणूकीच्या निकालानंतर जवळपास एक आठवडा प्रतिक्रिया टाळलेल्या चीनने अखेर डेमोक्रॅटीक पक्षाच्या ज्यो बायडेन यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले.
सध्या पदावर असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीतील गेल्या काही वर्षांत उभय देशांतील तणाव चिघळला होता. सुमारे चार दशकांपूर्वी औपचारिक राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यापासून प्रथमच इतका तणाव निर्माण झाला होता. नियोजीत अध्यक्ष बायडेन यांचे अभिनंदन न केलेल्या निवडक देशांत रशिया आणि मेक्सिकोच्या साथीत चीनचा समावेश होता. श्री. बायडेन यांना विजयी घोषित करण्यात आल्याची नोंद आम्ही घेतली आहे, इतकेच चीनकडून सांगण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी परराष्ट्र प्रवक्ते वँग वेनबीन यांनी नियमित पत्रकार परिषदेत अभिनंदनाचा संदेश दिला. अर्थात यानंतरही बायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर उभय देशांतील संबंधांमध्ये सुधारणा होण्याची खात्री देता येत नाही. प्रचारादरम्यान बायडेन यांनी चीनच्या मानवी हक्कांच्या संदर्भातील कामगिरीविषयी परखड मत व्यक्त केले होते. फेब्रुवारीत डेमोटक्रॅटीक पक्षाचा प्राथमिक वादविवाद पार पडला होता. त्यावेळी बायडेन यांनी चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग यांचा लुटारू असा उल्लेख केला होता. त्यानंतर प्रचारातही त्यांनी चीनमधील अल्पसंख्य मुस्लीम उईघुर समुदायावरील अत्याचाराचा उल्लेख नरसंहार असा केला होता. चीनने मात्र दहशतवादाच्या धोक्याला प्रत्युत्तर म्हणून व्यावसायिक प्रशिक्षणाचा भाग म्हणून आपल्या धोरणाचे समर्थन केले आहे.

"आम्ही अमेरिकी जनतेच्या पसंतीचा आदर करतो. आम्ही श्री. बायडेन आणि श्रीमती हॅरीस यांचे अभिनंदन करतो."
- वँग वेनबीन, चीनचे परराष्ट्र प्रवक्ते

संबंधित बातम्या