‘सत्याच्या शोधा’साठी चीनचे मंगळयान झेपावले

PTI
शुक्रवार, 24 जुलै 2020

संयुक्त अरब अमिरातीने तीन दिवसांपूर्वीच ‘अल अमल’ हा उपग्रह मंगळाच्या दिशेने सोडला आहे. त्यानंतर आज चीनने ‘लाँग मार्च -५’ या त्यांच्याकडील सर्वांत शक्तीशाली रॉकेटच्या साह्याने ‘तिआनवेन-१’चे प्रक्षेपण केले. हा उपग्रह सात महिने प्रवास करून मंगळाच्या कक्षेत प्रवेश करेल, असे चीन सरकारच्या ‘चायना एअरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन’ या संस्थेने सांगितले.

बीजिंग

चीनने आज त्यांच्या पहिल्या मंगळ मोहिमेला सुरुवात करताना ‘तिआनवेन-१’ (अंतिम सत्याचा शोध) या उपग्रहाचे प्रक्षेपण केले. हैनान प्रांतातील वेनचँग अवकाश केंद्रावरून हे प्रक्षेपण करण्यात आले. मंगळाचे चहूबाजूंनी निरीक्षण करणे, मंगळावर उतरणे आणि मंगळाच्या भूमीवर बग्गी उतरवून अभ्यास करणे, ही या मोहिमेची प्रमुख तीन उद्दीष्ट्ये आहेत.
संयुक्त अरब अमिरातीने तीन दिवसांपूर्वीच ‘अल अमल’ हा उपग्रह मंगळाच्या दिशेने सोडला आहे. त्यानंतर आज चीनने ‘लाँग मार्च -५’ या त्यांच्याकडील सर्वांत शक्तीशाली रॉकेटच्या साह्याने ‘तिआनवेन-१’चे प्रक्षेपण केले. हा उपग्रह सात महिने प्रवास करून मंगळाच्या कक्षेत प्रवेश करेल, असे चीन सरकारच्या ‘चायना एअरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन’ या संस्थेने सांगितले. हा मंगळावरील मातीचा, पर्यावरण, वातावरण, पाणी आणि भूरचना यांचा अभ्यास करणार आहे. हा उपग्रह मंगळाच्या कक्षेत पोहोचल्यानंतर त्याचे ऑर्बिटर (कक्षेत फिरणारे यान), लँडर आणि बग्गी हे तिन्ही भाग वेगळे होतील. ऑर्बिटर इतर अभ्यासासाठी कक्षेतच राहणार असून लँडर मंगळभूमीवर उतरणार आहे. त्यातून सहा चाकांची आणि चौर सौर पॅनेल असलेली बग्गी बाहेर येऊन जमिनीचे निरीक्षण करणार आहे.
गेल्या काही वर्षांत चीन मोठी अवकाशशक्ती म्हणून उदयास येत आहे. सध्या ते स्वत:चे अवकाशस्थानक बांधत आहेत. चीनने २०११ मध्येही मंगळ मोहिम आखली होती, मात्र ती अयशस्वी झाली होती. चीन आधी अमेरिका, रशिया, युरोपीय समुदाय आणि भारताने यशस्वी मंगळ मोहिम केली आहे. भारताच्या मंगळयानाने २०१४ मध्ये मंगळाच्या कक्षेत प्रवेश करत हे यश मिळविलेला आशियातील पहिला देश म्हणून मान्यता मिळवली आहे.

बग्गीची वैशिष्ट्ये
- २०० किलो : वजन
- ३ महिने : काम करणार
- ६ : शास्त्रीय उपकरणे

संपादन - अवित बगळे
 

संबंधित बातम्या